‘आल इज वेल’ म्हटलं की ‘३ इडियट्स’मधला आमिर खान चेहऱ्यासमोर येतो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांची मनं या चित्रपटाने जिंकली होती. रँचो, राजू आणि फरहान या तीन पात्रांनी तरुणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. एकीकडे या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा असतानाच आता त्याचा मेक्सिकन रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिल्लीतल्या जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये (JFF) या रिमेकला (3 Idiotas) ओपनिंग चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे.

मेक्सिकोमध्ये गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिथं सर्वाधिक कमाई त्याने केली. मेक्सिकन अभिनेते अल्फोन्सो डोसाल, ख्रिश्चन वाझक्वेज, जर्मन वाल्डेझ आणि मार्था हिगारेडा यांनी मुख्य भूमिका साकारल्या. यात अल्फोनोनं आमिरची, ख्रिश्चनने शर्मन जोशीची, जर्मनने आर. माधवनची तर मार्थाने करिना कपूरची भूमिका साकारली आहे.

Google Doodle : जाणून घ्या कोण होत्या गौहर जान

कलेला कोणतीही बंधनं नसतात, विविध भाषांच्या चित्रपटांमधून प्रेरणादायी कथा आपण आपल्या भाषेत प्रेक्षकांसमोर मांडली तर त्याचा सर्वाधिक फायदा होतो, असं वक्तव्य जागरण प्रकाशन लिमिटेडचे उपाध्यक्ष बसंत राठोड यांनी केलं.

यंदा जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. २९ जूनपासून सुरू होणारा चित्रपट महोत्सव ३ जुलैपर्यंत चालणार आहे.