काही दिवसांपूर्वी मुंबईत माहिमला भेटलेला बयोआजीचा तीन वर्षांचा चाहता थेट बयोआजीच्या घरी पोहोचला. इतकंच नाही, तर घरी केलेलं पॅटिस आणि केळ्याचे वेफर्स खाऊन खूश झाला. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेत बयोआजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नीलकांती पाटेकर यांना सिटीलाईटला एक तीन वर्षांचा चिमुकला फॅन भेटला. भर रस्त्यात या छोट्या मुलांने त्यांना 'बयोआजी, बयोआजी..' अशी हाक मारली होती. नीलकांती पाटेकर यांनी त्यावेळी त्याच्याशी गप्पाही मारल्या. मात्र, त्या ओझरत्या भेटीनं त्याचं काही समाधान झालं नाही. पुढे महिनाभर बयोआजीला भेटायचंय म्हणून त्यानं हट्ट केला. त्याच्या आजीनं नीलकांती पाटेकर यांची ओळख काढली. त्याच्या वडिलांबरोबर आलेल्या या तीन वर्षांच्या छोट्या फॅनची नीलकांती पाटेकर यांच्यासह त्यांच्याच घरी भेट झाली. या भेटीनं हा छोटा पाहुणा एकदम खूश झाला. त्यानं विचारलं, 'बयोआजी तू टिव्हीत एवढी का रागावतेस?' त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं असा प्रश्न नीलकांती पाटेकर यांना पडला. 'अरे, ते सगळं खोटं असतं,' असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यावर त्या मुलाची प्रतिक्रिया मार्मिक होती. तो म्हणाला, 'पण ते खरं वाटतं ना!' त्याचं हे उत्तर म्हणजे पाटेकर यांच्या अभिनयाला दाद होती. वाचा : या सेलिब्रिटींनी ऐनवेळी मोडले लग्न छोट्या चाहत्याच्या भेटीबद्दल नीलकांती पाटेकर म्हणाल्या, 'मोठ्यांप्रमाणेच ४ ते ६ वयोगटातली मुलंही गोठ बघतात ती आपल्या आजी आजोबांबरोबर. साधारणपणे १०-१२ मुलं मला स्टुडिओत आणि इतरत्र भेटून गेली आहेत. खल प्रवृत्तीच्या बयोआजीकडे ही मुलं इतकी आकर्षित कशी होतात, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. नंतर लक्षात आलं दुष्ट प्रवृत्ती म्हणजे नक्की काय याची ओळख या चिमण्यांच्या जगात अजून झाली नसल्याने ते त्याला रागीट समजतात, आणि असते अशी एखादी आजी.. तशी ही.. इथं त्यांचा विषय संपतो. त्यामुळे बयोची मोठ्यांना वाटते तशी भीती यांच्या मनात नसते. मला प्रत्यक्ष भेटूनही त्यांच्या मनात बयोआजीचीच इमेज असते.' वाचा : जेव्हा भिकारी दिलीप जोशींना 'जेठालाल' म्हणून हाक मारतो