लोकसत्ता प्रतिनिधी

गेल्या महिन्याभरात अनेक वाहिन्यांनी त्यांच्या जुन्या मालिका गुंडाळून नव्या मालिका, नवे कलाकार आणण्यावर भर दिला आहे. काही हिंदी मालिकांच्या रिमेक आहेत, तर काही नवीन कथानक घेऊन प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवेपणाची गुढी घेऊन आलेल्या या मालिकांचा घेतलेला हा वेध…

मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या अनेक नवीन मालिका प्रसारित झाल्या आहेत. तर आणखी काही नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहेत. या प्रसारित नवीन मालिकांमध्ये झी मराठी वाहिनीवरील तीन नव्या मालिका, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या मालिकांचा समावेश आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘पारू’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पारू’ मालिकेचं संपूर्ण कथानक अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं बलाढ्य साम्राज्य आणि गावाकडून आलेली साधीभोळी ‘पारू’ कशी सगळ्यांना आपलंसं करणार यावर आधारित आहे. आता ही ‘पारू’ अहिल्यादेवींच्या मनात कशी जागा निर्माण करणार हे या मालिकेत पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >>>‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर नव्याने सुरू झाली असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापटने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार आहे. याशिवाय राकेशसह ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत दिसत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक करण्यात आली आहे.

झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू झालेली आणखी एक मालिका म्हणजे ‘पुन्हा कर्तव्य आहे’. या मालिकेत अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. आयुष्यातला जोडीदार गेल्यानंतर एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं आणि त्या मुलांना आई किंवा वडील नसण्याची कमतरता भासणं असा सर्वसाधारणपणे या गोष्टीचा आशय आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे.

हेही वाचा >>>‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार

त्याचबरोबर इंद्रायणी ही नवीन मालिका प्रदर्शित झाली आहे. संत परंपरेने महाराष्ट्राला तत्त्वज्ञानाची, विचारांची एक बैठक घालून दिली आहे. याच वैचारिक संप्रदायाच्या संस्कारात वाढलेली छोटी इंद्रायणी कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सांची भोईर ही बालकलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर, अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या दोन तगड्या कलाकारांबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं लेखन लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. विनोद लव्हेकर ‘इंद्रायणी’ या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर ह्यघरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. नव्याने सुरू झालेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ या कवितेतील ओळींवर आधारित आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे, सुमित पुसावळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, सविता प्रभुणे, नयना आपटे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, अक्षय वाघमारे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, गीता निखाग्रे, बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी आहे.

ह्यसाधी माणसंह्ण ही नवी प्रसारित झालेल्या मालिकेत, अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे कलाकार एकत्र काम करणार आहेत. शिवानी बावकर ही मीराच्या भूमिकेत तर आकाश नलावडे हा सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकाच शहरात राहणाऱ्या या दोघांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. त्यामुळे नियती यांच्या भविष्यात काय घडवून आणणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या नव्याने सुरू झालेल्या मालिकांसोबतच कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक विनोदी कार्यक्रम सुरू होणार आहे. डॉ. नीलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार असून या कार्यक्रमाचे नाव आहे, ‘‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. नीलेश साबळे स्वत: सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार त्यांना साथ देणार आहेत. येत्या २० एप्रिलपासून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.