बॉलीवूड अभिनेता आमिर खानप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही चित्रपटसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण करायची होती, पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिर खानबरोबर ‘मेला’ चित्रपटात दिसला होता.

फैजलचे व्यावसायिक आयुष्य कदाचित चर्चेत नसेल, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो. दरम्यान, फैजल त्याच्या नवीन मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुलाखतीत फैजलने धक्कादायक दावे केले आहेत. त्याने म्हटले आहे की, त्याचा स्वतःचा भाऊ आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात कोंडून ठेवले होते.

‘मला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आले’ : फैजल खान

फैजल खानने अलीकडेच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यादरम्यान फैजलने आमिर खान तसेच इंडस्ट्रीतील लोकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. फैजलने मुलाखतीत म्हटले आहे की, ‘त्यांनी मला एक वर्ष आमिरच्या घरात कोंडून ठेवले आणि जबरदस्तीने औषधे दिली. त्यांनी दावा केला की मला स्किझोफ्रेनिया आहे आणि मी समाजासाठी धोकादायक आहे.”

फैजल पुढे म्हणाला, “औषधांचा त्याच्या शारीरिक आणि आरोग्यावर वाईट परिणाम झाला आणि त्याचे वजन १०३ किलोपर्यंत वाढले, कारण ते अनावश्यक आणि हानिकारक होते. या गोष्टींमुळे माझ्या कारकिर्दीत अनेक समस्या निर्माण झाल्या. इतकेच नाही तर ते ‘चक्रव्यूह’मध्ये अडकल्यासारखे होते, जिथे माझे संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात होते. मी स्वतःकडे पाहात होतो की मी या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडू.”

फैजल म्हणाला, “माझ्या सर्व आर्थिक आणि कायदेशीर निर्णयांवर आमिरने नियंत्रण ठेवले होते… मला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्याने माझा मोबाईल फोन काढून घेतला. माझ्या खोलीबाहेर एक अंगरक्षक तैनात करण्यात आला होता. मी आमिरला मला दुसऱ्या घरात हलवण्याची विनंती केली होती. जवळपास एका वर्षानंतर, माझ्या सततच्या आग्रहानंतर आमिरने मला दुसऱ्या घरात राहण्याची परवानगी दिली.” पुढे फैजलनं सांगितलं की, जेजे हॉस्पिटलमध्ये त्याची २० दिवस मानसिक चाचणी घेण्यात आली होती, ज्यात तो पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.

बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान जेवढा बॉलीवूडमध्ये यशस्वी झाला तेवढा त्याचा भाऊ फैजल खान होऊ शकला नाही. फैजल खान हा आमिर खानचा लहान भाऊ आहे. त्याने १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या आमिरच्या चित्रपटात एक लहान भूमिका साकारली होती. त्यानंतर २००० साली आमिरसोबतच ‘मेला’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, ज्यामुळे फैजलचे करिअर पुढे सरकू शकले नाही. फैजलने काही इतर चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे.