आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ घरच्या घरी बसून पाहण्याचे मनसुबे आखणाऱ्यांसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी तूर्तास तरी मोठाच धक्का दिला आहे. कितीही बिग बजेट चित्रपट असला तरी सहा महिन्यांच्या आत तो अधिकृतरीत्या वाहिन्यांवर झळकतो. त्याचा छोटय़ा पडद्यावरही ‘प्रीमिअर’ केला जातो. एरव्ही मोठय़ा कलाकारांच्या चित्रपटांसाठी जुगाड करणाऱ्या वाहिन्यांनी आमिरच्या ‘पीके’कडे दुर्लक्ष केले आहे, असे म्हटले तर खरे वाटणार नाही. मात्र ‘पीके’साठी कोणत्याही वाहिनीकडून चांगली किंमत न मिळाल्यानेच निर्मात्यांना हा चित्रपट टीव्हीवर दाखवणे अशक्य झाले आहे. आमिर, सलमान, शाहरुख या ‘खाना’वळीच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर किती कमाई केली याच्यापेक्षाही या चित्रपटांचे उपग्रह प्रक्षेपणाचे हक्क किती किमतीत विकले गेले याची आकडेवारी पहिली जाहीर होते, मात्र राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ याला अपवाद ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण २४६.३२ कोटी रुपये कमाई केली असून, दुसऱ्या आठवडय़ातही चित्रपटाला चांगली गर्दी आहे. असे असूनही या चित्रपटाला अजून छोटय़ा पडद्यावरून कोणाचीच मागणी आलेली नाही, हे बुचकळ्यात टाकणारे आहे. चित्रपटाच्या आशयावरून दाखल झालेल्या याचिका, कोर्टकचेरी आणि रामदेव बाबांपासून सामान्यांपर्यंत सर्वानी उठवलेली टीकेची झोड याला कारणीभूत ठरली असेल. तर तसेही झालेली नाही. गेल्या सहा महिन्यांत चित्रपटाचे निर्माते आणि विविध वाहिन्यांचे अधिकारी यांच्यात बोलणी सुरू होती, मात्र कुठल्याही वाहिनीकडून चांगली किंमत या चित्रपटाला मिळालेली नसल्यानेच हा चित्रपट सध्या तरी चित्रपटगृहांमधूनच दाखवण्यात येणार आहे.

आणखी एक प्रसिद्धीतंत्र?
आमिर खानने ‘पीके’साठी तिकिटाचे दर वाढवले. त्यामुळे ‘मराठा मंदिर’सारख्या बऱ्याचशा एकपडदा चित्रपटगृहांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. आताही उपग्रह प्रक्षेपणाचे हक्क विकण्यासाठीही चित्रपटाच्या निर्मात्यांना जास्त किंमत हवी आहे आणि तशी किंमत द्यायला अजून कोणतीही वाहिनी तयार झालेली नाही. निर्माते आणि वाहिन्या एकमेकांच्या मुद्दय़ावर अडून बसले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोणताही करार झालेला नाही, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले. आता हे वास्तव आहे की अशाप्रकारची चर्चा उठवून वाहिन्यांकडून हवी ती किंमत पदरात पाडण्याचे तंत्र आहे हे आमिर खान आणि निर्मातेच जाणोत. मात्र या दोघांच्याही भांडणात प्रेक्षकांना टीव्हीवर चित्रपट पाहता येणार नाही हे वास्तव आहे.