‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाड्याने देण्यात आले होते. मात्र त्यावरुन झालेल्या गदारोळावरुन अखेर हा सेट हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट सात दिवसात काढण्याच्या सूचना मंजुळे यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. नागराज मंजुळे क्रीडासंबंधित विषयावर चित्रपट काढत असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना मैदान भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले होते. मात्र कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कुलगुरुंनी चित्रिकरण बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

या निर्णयामुळे सात दिवसांत मंजुळे यांना सेट काढून मैदान जैसे थे परिस्थितीत विद्यापीठाला परत करावे लागणार आहे. दरम्यान, सेट उभारण्यासाठी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल, जिल्हा प्रशासन आणि उच्च शिक्षण संचालनालय या कोणाचीच परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठाने सरकारी जागा इतर कामासाठी दिल्याने शर्तभंग केल्याने कारवाई होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच, उच्च शिक्षण संचालनालयाने देखील सेट उभारण्याबाबत विद्यापीठावर ताशेरे ओढले होते. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री यांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला नोटीस बजावत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विद्यापीठाने सेट उभारण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने कारभार केल्याचे मान्य केले होते. या पार्श्वभूमीवर आज कुलगुरू डॉ. करमळकर यांनी मंजुळे यांना सात दिवसात सेट काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाचे पुढील चित्रिकरण कुठे होणार हा प्रश्न दिग्दर्शक मंजुळेंपुढे आहे.