सलमान खानचे अनेक किस्से बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की एका प्रसिद्ध अभिनेत्याने सलमान खानला सेटवर ओरडले होते. खरंतर तो अभिनेता सलमानच्या एका कृतीने इतका संतापला होता की त्याने विचार न करता त्याला सर्वांसमोर सुनावलं होतं. याचा परिणाम असा झाला की दोघेही २३ वर्षे एकमेकांशी बोलले नाही किंवा एकत्र काम केले नाही.

आम्ही बोलत आहोत डॅनी डेन्झोंगपा यांच्याबद्दल. बॉलीवूड शादीच्या वृत्तानुसार, डॅनी यांना नेहमीच वेळेवर येण्याची सवय आहे. चित्रपटसृष्टीत डॅनी यांचा सगळेच आदर करतात. कारण ते फार शिस्तप्रिय आहेत. ‘सनम बेवफा’च्या शुटिंगदरम्यान सलमान खान सेटवर नेहमी उशिरा येत असे. अनेकदा तर सलमान खान इतका उशीर करायचा की, डॅनी त्याची वाट पाहून दमून जायचे. डॅनी यांनी एक-दोन वेळा सलमान खानला वेळेत येण्यासाठी समजावण्याचाही प्रयत्न केला. पण सलमान खानला त्याचा काही फरक पडला नाही. एके दिवशी डॅनी यांचा संयम सुटला. डॅनी यांनी सलमान खानला सर्वांसमोर सुनावलं होतं. यानंतर सलमान खान आणि डॅनी यांच्यातील बोलणं कमी झालं होतं. अखेर चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट झाला.

१९९१ मध्ये सलमान खानचा ‘सनम बेवफा’ नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाची कथाच नाही तर गाणीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका डॅनी डेन्झोंगपा यांनी निभावली होती. त्या चित्रपटातील डॅनी यांच्या पात्राचं नाव शेरखान होतं जो एक गर्विष्ठ आणि हट्टी सावकार होता.

रिपोर्ट्सनुसार, ते सलमानबरोबरच्या चित्रपटांच्या ऑफर नाकारत राहिले. २३ वर्षांनंतर, डॅनी यांनी सलमानबरोबर काम करण्यास होकार दिला आणि त्यांनी ‘जय हो’ चित्रपटात एकत्र काम केले.

डॅनी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तमिळ, नेपाळी, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय ते एक प्लेबॅक सिंगर आणि दिग्दर्शक देखील आहेत. डॅनी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती.

सलमानबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता ज्यामध्ये त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना होती. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. आता सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये दिसणार आहे ज्यामध्ये तो जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.