गेल्या बऱ्याच वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषय हाताळण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘कच्चा लिंबू’. अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक रवी जाधवची नवी इनिंग या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. आपल्या मुलांना मोठं करताना प्रत्येक आई- वडिलांच्या काही भावना असतात. मुलांकडून त्यांची काही स्वप्नं असतात. मुळात पालकांच्या याच अपेक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आपण यशस्वी होतो. त्यामुळे आई- बाबा नेहमीच स्पेशल असतात. हाच मुद्दा प्रकाशझोतात आणत दिग्दर्शक आणि अभिनेता रवी जाधवने त्याच्या फेसबुक पेजवरुन एक फोटो शेअर केला आहे.
रवीने त्याच्या आई- बाबांचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये आई- बाबांविषयी थोडक्यात आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ‘१९८२ च्या आधी म्हणजेच गिरणी कामगारांच्या संपाच्या आधीचे दिवस असे होते…. ८२ नंतर कधीही असा फोटो काढता आला नाही… असो…. महाभीषण संपात पण तग धरुन आम्हा भावंडांना आपल्या पायावर उभे करणारे हेच ते माझे ‘स्पेशल आईबाबा’!!!’, असं लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने इतरांनाही त्यांच्या आई बाबांसोबतचे फोटो पोस्ट करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्याला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आई- बाबांचे फोटो बऱ्याचजणांनी रवी जाधवला टॅग करून शेअर केले आहेत.
रवीच्या या खास उपक्रमात काही कलाकारांनीही त्यांच्या कुटुंब आणि आई- बाबांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रिया बापट, उमेश कामत, चिन्मय मांडलेकर, फुलवा खामकर, नेहा राजपाल आणि अमृता सुभाष या कलाकारांचा समावेश आहे. हे प्रत्येक फोटो पाहताना प्रत्येकाला स्वतःच्या आई- बाबांची आठवण आल्यावाचून राहणार नाही. कारण, आयुष्यात अगदी खेळामध्ये आपण ‘कच्चा लिंबू’ असल्यापासून ते अगदी या जगात प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करण्याचं सामर्थ्य आपल्यात येईपर्यंत या आई- बाबांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची अनुभूती होतेय हे नाकारता येणार नाही.