दाक्षिणात्य अभिनेता व शेफ मधमपट्टी रंगराज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आधीच विवाहित असलेल्या मधमपट्टीने जुलै महिन्यात स्टायलिस्ट जॉय क्रिझिल्डाशी मंदिरात लग्न केलं होतं. दोघांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले होते. तसेच लवकरच ते आई-बाबा होणार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण काही दिवसांनी जॉयने मधमपट्टीने त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवली आणि आपल्याला सोडून दिलं, असा आरोप करत पोलीस तक्रार दिली.
जॉय क्रिझिल्डाने नंतर महिला आयोगात धाव घेतली. महिला आयोगाने चौकशी सुरू केली आणि चेन्नई पोलीस आयुक्त आणि महिला आणि बाल गुन्हे विभागाला त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगितलं. हे बाळ त्याचं आहे, असं मधमपट्टीने महिला आयोगासमोर कबूल केलं आहे, असा दावा जॉय क्रिझिल्डाने सोशल मीडियावर केला. आता मधमपट्टी रंगराजने स्पष्टीकरण देत जॉयचा हा दावा फेटाळून लावला.
मधमपट्टी रंगराजने महिला आयोगासमोर बाळ आपलं असल्याची कोणतीही कबुली दिली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच जॉय क्रिझिल्डाने जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडलं, तिने खासगी फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असं मधमपट्टीने म्हटलंय.
मर्जीने लग्न केलेलं नाही – मधमपट्टी रंगराज
“मी महिला आयोगाच्या चौकशीत कोणतीही कबुली दिलेली नाही. मी जॉय क्रिझिल्डाशी मर्जीने लग्न केलं आहे, असंही मी कधीच म्हटलेलं नाही. आमचं लग्न दबावाखाली झालं, कारण तिने मला बदनाम करण्यासाठी खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी मला लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं,” असं मधमपट्टी रंगराजने म्हटलंय.
जॉयने पैसे मागितले
हे संपूर्ण प्रकरण कोर्टात नेण्यास तयार आहे, कारण यासंदर्भात सर्व दावे सिद्ध करण्यासाठी पुरावे आहेत, असंही मधमपट्टीने म्हटलंय. “जॉय क्रिझिल्डाने तिच्या बीएमडब्ल्यू कारचा ईएमआय भरण्यासाठी मला दरमहा १.२५ लाख आणि तिच्या खर्चासाठी महिन्याला १.५ लाख रुपये मागितले. पण मी नकार दिला. मी कधीच डीएनए चाचणीसाठी नाही म्हटलेलं नाही. ते माझं मूल आहे हे डीएनए चाचणीतून सिद्ध झाल्यास मी आयुष्यभर त्याची काळजी घेईन. महिला आयोगाच्या शिफारशीत नमूद केल्याप्रमाणे मी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मी त्याविरुद्ध न्यायालयात अपील करेन आणि सत्य सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करेन,” असं मधमपट्टी रंगराजने लिहिलं.
दरम्यान, मधमपट्टी रंगराजची पहिली पत्नी श्रुती रंगराज ही वकील आहे. दोघांनाही दोन मुलं आहेत. श्रुतीला सगळं माहित असल्याचा दावा जॉयने केला होता. “तिला सगळं माहित आहे. रंगराजने स्वतःच मला सांगितलं होतं की त्याने तिला आमच्याबद्दल सांगितलंय आणि तिला काहीच अडचण नाहीये,” असं जॉय म्हणाली होती.
