scorecardresearch

Premium

‘दबावापुढे न झुकण्याची भूमिका घ्यायला हवी’

 ‘स्कूप’ या वेबमालिकेतील भूमिकेसाठी प्रशंसा मिळवल्यानंतर झीशान पुन्हा एकदा ‘हड्डी’ या चित्रपटात हरिका या तृतीयपंथीयाच्या प्रियकराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे.

actor mohammed zeeshan ayyub
झीशान अय्युब

रेश्मा राईकवार

चोखंदळ भूमिकांमधून सातत्याने प्रेक्षकांसमोर येणं ही हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांसाठी वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. तरीही आपापल्या पद्धतीने काम करत असताना सिनेमा वा वेबमालिकांमधील आशयासंदर्भात आक्षेप घेतले जातात आणि त्याचा परिणाम संबंधित कलाकारांवरही होतो. अशा वेळी एकतर कुठल्याही प्रकारच्या दबावापुढे न झुकणं वा ते जमत नसेल तर जे होईल त्यापुढे मान तुकवून काम करत राहणं यातली कुठलीतरी ठाम भूमिका कलाकाराने घ्यायला हवी, असं परखड मत अभिनेता झीशान अय्युबने व्यक्त केलं.

askshay kumar shahrukh khan salman khan
यशाची नवी समीकरणे!
shahrukh-khan-sachin-tendulkar
शाहरुख खानच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटातून सचिन तेंडुलकर करणार होता बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण…
Jawan
‘जवान’च्या निर्मात्यांची प्रेक्षकांना खास भेट, ‘ही’ धमाकेदार ऑफर वाचलीत का? जाणून घ्या कोणाला घेता येईल लाभ
salaar-dunki
शाहरुखच्या ‘डंकी’समोर प्रभासचा ‘सालार’ उभा ठाकणार; ट्रेड एक्स्पर्टच्या मते कोणाला बसणार फटका? जाणून घ्या

 ‘स्कूप’ या वेबमालिकेतील भूमिकेसाठी प्रशंसा मिळवल्यानंतर झीशान पुन्हा एकदा ‘हड्डी’ या चित्रपटात हरिका या तृतीयपंथीयाच्या प्रियकराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘तांडव’ या वेबमालिकेतील आशयावरून उठलेल्या वादंगामुळे निर्माते आणि कलाकारांनाही कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागलं होतं. या मालिकेनंतर आपल्याबाबतचा इंडस्ट्रीतील लोकांचा दृष्टिकोन अचानक बदलला, कामं मिळेनाशी झाली याबद्दल काही महिन्यांपूर्वी झीशान माध्यमांसमोर व्यक्त झाला होता. सध्या मी जे चित्रपट आणि वेबमालिका केल्या त्या हळूहळू प्रेक्षकांसमोर येत आहेत. नवीन भूमिकेच्या शोधात आहे, असं सांगत झीशान ‘हड्डी’तील भूमिका आणि प्रामुख्याने नवाझुद्दीन सिद्दिकीसारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल भरभरून बोलतो.

हेही वाचा >>> मैत्रीतल्या जांगडगुत्त्याची विनोदी कथा

ही भूमिका कठीण नव्हती..

तृतीयपंथी व्यक्तीचा प्रियकर साकारणं हे आव्हानात्मक वा कठीण असं काही नव्हतं, असं झीशान म्हणतो. मुळात एका व्यक्तीवर प्रेम करणं ही यातली कल्पना आहे आणि प्रेम हे आपण व्यक्तीच्या स्वभावावर करत असतो, फक्त बाह्य रूपावर नाही. त्यामुळे खूप सहज अशी ही भूमिका होती, असं त्याने स्पष्ट केलं.  तृतीयपंथी समाजाचं चित्रण या चित्रपटात केलं असून यात हरिकाची प्रेमकथाही आहे. असे विषय लोक स्वीकारत नाहीत हे आपल्यापैकीच काही लोकांनी लढवलेले तर्कवितर्क आहेत. प्रत्यक्षात प्रेक्षक विविधांगी विषयांवरील चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात, असं मत झीशानने व्यक्त केलं.

लोक आपापले मुद्दे काढून चित्रपटाबाबत वादविवाद करत राहतात. कलाकार म्हणून याकडे लक्ष न देता आपण काम करायला हवं, असं तो म्हणतो. ‘हड्डी’चाच संदर्भ देत तो म्हणतो, ‘तृतीयपंथी व्यक्तीचा प्रियकर साकारतो आहेस हे योग्य नाही असं काहीजण म्हणतीलच.. अशा पद्धतीने लोकांच्या म्हणण्याचा विचार करत राहिलो तर मी वेगळय़ा भूमिका करूच शकत नाही’. लोकांकडून विनाकारण होणारी टीका, आक्षेप यांचा मोठा दबाव निर्मात्यांवर येत असतो असं मत त्याने व्यक्त केलं. 

कोणतीही व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर हरकत घेऊ शकते. तक्रार दाखल करू शकते. माझं आयुष्य मी तुमच्या विचाराने किंवा तुमच्या पद्धतीने घालवायला लागलो तर पुढेच जाऊ शकत नाही. मात्र चित्रपट – वेबमालिका यांच्या आशयाबद्दल लोकांकडून होणारी ढवळाढवळ, आक्षेप याचा निश्चित परिणाम कलाकृतींवर होत असतो.       झीशान अय्युब

देखण्या चेहऱ्याची नेमकी व्याख्या तरी काय?’

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि मी ‘रईस’मध्ये एकत्र होतो, पण आमचं एकमेकांबरोबर फारसं काम नव्हतं. एकतरी चित्रपट त्यांच्याबरोबर करायला मिळावा ही इच्छा होती ती ‘हड्डी’मुळे पूर्ण झाली. या चित्रपटात तर नवाझ यांच्याबरोबर त्यांचा प्रियकर म्हणून प्रणयही करायचा होता म्हटल्यावर चित्रपट करताना आणखी मजा येईल, असा विचार होता. हरिका ही तृतीयपंथी व्यक्तिरेखा नवाझुद्दीन यांनी साकारली आहे. काय कमाल दिसले आहेत ते पडद्यावर.. एरव्हीही हा माणूस पडद्यावर येतो तेव्हा प्रचंड देखणा दिसतो. त्यांचा चेहरा रुढीबाह्य आहे वगैरे चर्चा का केल्या जातात हेच माझ्या डोक्यात शिरत नाही. देखण्या चेहऱ्याची लोकांची नेमकी व्याख्या तरी काय..  हे काही कळत नाही, असं सांगतानाच नवाझुद्दीन यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव विलक्षण होता असं झीशान याने सांगितलं.

नागराज मंजुळेंनी भूमिका देऊ केली तर..

माझी पत्नी महाराष्ट्रीय आहे. त्यामुळे मला मराठी भाषा समजते, पण ती बोलणं कठीण जातं, असं झीशानने सांगितलं. मराठी भाषा बोलण्याबद्दल माझ्या मर्यादा आहेत. ‘ळ’ सारखी अक्षरं उच्चारणं मला जड जातं, अर्थात यात मी कमी पडतो. पण मराठी चित्रपट मी नेहमी बघतो, असं त्याने सांगितलं. नागराज मंजुळेंसारख्या  दिग्दर्शकाने त्याच्या मराठी चित्रपटात भूमिका दिली तर मी ती नक्की करेन, असंही त्याने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor mohammed zeeshan ayyub opens up about his journey zws

First published on: 24-09-2023 at 06:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×