अभिनेते प्रकाश राज यांना अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) समन्स बजावलं आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं हे समन्स बजावलं आहे. पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीनं तामिळनाडूतील प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. छापेमारीनंतर ईडीनं प्रकाश राज यांना नोटीस बजावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रणव ज्वेलर्सने सोने गुंतवणूक योजनेचं आमिष दाखवून नागरिकांकडून १०० कोटी रूपये गोळा केले. पण, कंपनीनं जनतेची फसवणूक केली. याचप्रकरणात ईडीनं तामिळनाडूच्या तिरूचिरापल्ली येथील प्रणव ज्वेलर्सवर २० नोव्हेंबरला छापेमारी केली होती. त्यानंतर २३.७० लाख रूपयांची रोकड आणि ११.६० किलो सोन्याचं दागिने ईडीने जप्त केलं होते.

प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे सदिच्छादूत ( ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर ) आहेत. त्यामुळे प्रकाश राज यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. प्रकाश राज यांना पुढील आठवड्यात चेन्नईतील ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले आहेत.