उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवतींवर अपमानजनक,अश्लील विनोद करणं अभिनेता रणदीप हुड्डाला चांगलंच भोवलं. रणदीप हुड्डाला संयुक्त राष्ट्राच्या स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्राणी व प्रजातींच्या संरक्षण संमेलनाच्या म्हणजेच सीएमएसच्या ब्रॅंड अॅम्बेसिडर पदावरून हटवलं आहे. नऊ वर्षापूर्वी रणदीप हुड्डाने एका शो दरम्यान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवतींवर ‘डर्टी जोक’ करत जातिवाचक शब्दाचा देखील वापर केला होता. नऊ वर्षापूर्वीच्या या जुन्या व्हिडीओमुळे रणदीपला मात्र मोठी किंमत मोजावी लागली आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा हा संयुक्त राष्ट्राच्या सीएमएसचा ब्रॅंड अॅम्बेसिडर होता. परंतू आता त्याला या पदावरून हटवण्यात आलंय. मायावतींवर केलेल्या अश्लील विनोदामुळे त्याची ही हकालपट्टी केली असल्याचं सांगण्यात आलंय.
२०१२ साली एका मीडिया हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची ४३ सेकंदाची एक क्लिप सध्या चर्चेत आली. यात अभिनेता रणदीप हुड्डा त्या शो दरम्यान प्रेक्षकांना अश्लील विनोद सांगत होता. याच दरम्यान तो म्हणाला, “तुम्हाला मी एक ‘डर्टी जोक’ सांगतो…मिस मायावती दोन लहान मुलांसोबत एका गल्लीमधून जात होत्या…तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं, ही दोन्ही मुलं जुळे आहेत का ? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही, एक ४ वर्षाचा आहे आणि दुसरा ८ वर्षाचा आहे. त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.”
अभिनेता रणदीपच्या हा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. रणदीपने एका राजकीय महिलेवर केलेल्या या ‘डर्टी जोक’मुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक युजर्सनी तर “याला अटक करा”, अशी मागणीच केलीय. त्याच्या या व्हिडीओवर युजर्सचे कमेंट्स पाहून रणदीपचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं सांगत त्याला सीएमएसचा ब्रॅंड अॅम्बेसिडर पदावरून काढण्यात आलं असल्याचं सीएमएस सचिवालयाने सांगितलंय. यावर स्पष्टीकरण देताना सीएमएस सचिवालयाकडून सांगितलं की, “रणदीपने केलेलं हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांच्या मुल्यांमध्ये बसत नाही, त्यामूळे अभिनेता रणदीप हुड्डाला वन्यजीव प्राणी व प्रजातींच्या संरक्षण (सीएमएस) मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसेडर पदावरून काढण्यात आलं आहे.”
Statement of the Secretariat of the Convention for the Conservation of Migratory Species of Wild Animals (CMS) on Mr. Randeep Hoodahttps://t.co/ex5ymsQaiC
— Convention on Migratory Species (CMS) (@BonnConvention) May 27, 2021
अभिनेता रणदीप हुड्डा याची २०२० साली वन्यजीव प्राणी व प्रजातींच्या संरक्षण संमेलन म्हणजेच सीएमएसच्या ब्रॅंड अॅम्बेसिडर पदासाठी नियूक्ती केली होती. ही नियुक्ती तीन वर्षांसाठीची होती. सीएमएस ही संयुक्त राष्ट्रासोबत करार केलेली एक दुय्यम संस्था आहे. ही संस्था संयुक्त राष्ट्र सचिवालय आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमापेक्षा वेगळी असली तरी रणदीप हुड्डाची ब्रॅंड अॅम्बेसिडरचे भूमिका ही एकत्रितरित्या होती.
रणदीप हुड्डाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. याबाबत रणदीपने जाहीर माफी मागावी, अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. तर रणदीपसारख्या कलाकाराकडून अशा प्रकारची टिप्पणी अपेक्षित नाही, असंही काहींनी म्हटलंय. जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत असल्यानेही काही नेटकऱ्यांनी रणदीपला सल्ला दिला आहे. ‘सोशल मीडियाचा जमाना असल्याने कधी कुठे काय बोललो हे महागात पडेल सांगता येत नाही, त्यामुळे विचारपूर्वक बोलावं’, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यासाठी आज ट्विटरवर #ArrestRandeepHooda हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.