राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ‘रेड २’ या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील रितेशच्या कामाचे कौतुक होत आहे.
रितेश आणि सलमान खानमध्ये खूप चांगले नाते आहे. दोघेही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करतात. आता रितेशने सलमान खानच्या त्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये सलमानने म्हटले होते की, त्याला इंडस्ट्रीमध्ये कमी पाठिंबा मिळतो. पण, तो नेहमीच सर्वांना पाठिंबा देत असतो असं रितेश म्हणाला.
रितेश सलमानबद्दल काय बोलला?
नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत रितेशने म्हटले, “तो नेहमी माझ्या पाठिशी असतो. तो नेहमी मला फोन करतो आणि म्हणतो की तुझा ट्रेलर पाठव, मला बघायचा आहे. तो असा माणूस आहे, ज्याला तुमच्यासाठी काहीतरी करायचे असते. तो अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करतो. सलमानचं म्हणणं योग्य आहे की कधीकधी लोक त्याला पाठिंबा देत नाहीत.”
इंडस्ट्रीमध्ये मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल रितेशने पुढे सांगितले की, ‘लोक नेहमीच मला पाठिंबा देतात. याची अनेक उदाहरणे आहेत, पहिलं सलमान भाऊ.. सलमानने माझा पहिला चित्रपट ‘लय भारी’पासून ते ‘वेड’पर्यंतच्या प्रवासात कायम साथ दिली. जेव्हा मी माझे प्रोडक्ट इमॅजिन मीट्स लाँच करत होतो, तेव्हा शाहरुख खानही तिथे आला होता. तर नाती अशी असतात, म्हणूनच मला कधीच वाटले नाही की कोणीही माझ्यासोबत नाही. मला माहीत आहे की, अभिषेक बच्चनला एक फोन केला तरी तो माझ्या मदतीला येईल.
सलमान काय म्हणाला होता?
एका कार्यक्रमात सलमानला विचारण्यात आले होते की, “तो नेहमीच सर्वांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतो, पण त्याच्या चित्रपटांना तसा पाठिंबा मिळत नाही. यावर सलमान म्हणाला, इतरांना वाटते की मला त्याची गरज नाही, पण सर्वांना गरज आहे.”
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा “रेड २” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत आणि त्याने ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.