दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट कलाकार एस. एम. राजू यांचा एका स्टंटदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पा रंजीत यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार उलटण्याचा धोकादायक स्टंट करत असताना ही घटना घडली. तातडीने वैद्यकीय मदत मिळवूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही. रविवारी, १३ जुलै रोजी ही घटना घडली.
राजू यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये स्टंट्स केले होते आणि ते अत्यंत अनुभवी आणि धाडसी स्टंटमॅन म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अभिनेता विशालने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत राजू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
एस. एम. राजू यांचा अपघाती मृत्यू झाला हे ऐकून मन हेलावलं आहे. ते एक अत्यंत मेहनती आणि निष्ठावान स्टंट कलाकार होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असं विशालने म्हटलंय.
अभिनेता विशालने राजू यांच्याबरोबर अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. विशालने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “आज सकाळी आर्य व रंजीतच्या चित्रपटासाठी कार टॉपलिंग सीन करताना स्टंट आर्टिस्ट राजू यांचे निधन झाले, या बातमीवर विश्वास बसत नाहीये. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. माझ्या चित्रपटांमध्ये त्यांनी बरेचदा अनेक धोकादायक स्टंट केले आहेत, कारण ते खूप धाडसी होते.”

विशालने राजू यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले. “माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाबरोबर आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देव त्याच्या कुटुंबाला या कठीण काळातून सावरण्याचं बळ देवो. मी त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी नक्कीच सोबत असेन, कारण मीही याच चित्रपट उद्योगाशी संबंधित आहे आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे,” असं विशालने पोस्टमध्ये लिहिलं.
दरम्यान, अद्याप आर्य व पा रंजीत यांनी राजू यांच्या निधनाबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.