Shreyas Talpade and Alok Nath Booked: प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सहकारी संस्थेने सुमारे ५०० गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा केल्या आणि नंतर ते पसार झाले. याप्रकरणी हरियाणातील बागपत पोलिसांनी श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमधील सुमारे ५०० लोकांकडून उच्च परताव्याचे आमिष दाखवत ठेवी मागितल्या. पण ठेवींवरील परतावा देण्यात आला नाही.
सूरज कुमार राय यांनी सांगितले की, लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीने ५०० हून अधिक लोकांकडून ठेवी घेतल्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पळ काढला. गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी परत केले नाहीत. गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले की, दोन कलाकार या सोसायटीची जाहिरात करत होते.
स्थानिक रहिवासी बबली नावाच्या तक्रारदाराने आरोप केला की, बागपत, शामली आणि मेरठसह यूपी आणि हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय एजंट्सद्वारे ही सोसायटी चालवली जात होती. विविध योजना, मुदत ठेवी, सुकन्या योजना, आयुष्मान योजना, बचत खाती आणि एटीएम-लिंक्ड पॉलिसींचा प्रचार सोसायटीने केला होता.
पाच कोटी रुपयांची फसवणूक
गुंतवणुकदारांनी केलेल्या आरोपानुसार, ही कंपनी निर्धारित कालावधीत पैसे दुप्पट करणअयाचे आश्वासन देत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण कथित फसवणूक सुमारे ५ कोटी रुपये इतकी आहे.
पोलिसांनी पुढे म्हटले की, २० ऑक्टोबर रोजी २२ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३५१ (२), अनियंत्रित ठेव योजनांवर बंदी कायदा आणि सोसायटी नोंदणी कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. “आम्ही कंपनीचे डिजिटल व्यवहार, बँक खाती आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स तपासत आहोत. गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यावर आरोप काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच प्रकरणात उत्तराखंडमध्ये यापूर्वी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ हे सहकारी संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करत होते. सोसायटीच्या जाहिरातींमध्येही ते दिसले होते, असा आरोप पीडितांनी केला आहे. या अभिनेत्यांच्या जाहिरातीमुळे योजनेवर विश्वास बसल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.
