प्रसिद्ध अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्चना कवीने दुसरं लग्न केलं आहे. चर्चमध्ये कुटुंबीय व मोजक्याच मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत अर्चनाने रिक वर्गीसशी लग्न केलं. टीव्ही होस्ट धान्या वर्माने गुरुवारी, १६ ऑक्टोबरला एक स्टोरी शेअर करून अर्चनाला शुभेच्छा दिल्या.

लग्न समारंभातील एक फोटो शेअर करत धान्या वर्माने लिहिलं, “आणि माझ्या डार्लिंगचं लग्न झालंय. अर्चना कवी आणि रिक वर्गीस.” धान्याने चर्चमधील लग्नाचा एक छोटासा व्हिडीओ देखील पोस्ट केला. यात अर्चनाच्या लग्नाची झलक पाहायला मिळतेय. अर्चना व रिक दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते.

अर्चना कवीने तिच्या सोशल मीडियावर लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली. ‘हो मी लग्न केलंय’ असं कॅप्शन देत तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींनी केलेल्या पोस्ट तिने रिपोस्ट केल्या आहेत. अर्चना व रिक यांच्या लग्नातील फोटोग्राफरने काही फोटो कोलॅब करून पोस्ट केले आहेत, ते अर्चनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळत आहेत.

Archana Kavi marries Rick Varghese
अर्चना कवीची पोस्ट

पाहा फोटो-

३५ वर्षांच्या अर्चना कवीचं हे दुसरं लग्न आहे. अर्चनाचं पहिलं लग्न २०१५ मध्ये कॉमेडियन आणि युट्यूबर अबिश मॅथ्यूशी झालं होतं. पण सहा वर्षांनी २०२१ मध्ये अबिश व अर्चना परस्पर सहमतीने वेगळे झाले. घटस्फोटानंतर चार वर्षांनी अर्चना मॅथ्यूने रिक वर्गीसशी खासगी सोहळ्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.

अर्चना कवीने २००९ मध्ये लाल जोसच्या ‘नीलथमारा’ या चित्रपटाच्या रिमेकमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मध्यंतरी अर्चनाने अभिनयातून ब्रेक घेतला. ती टोव्हिनो थॉमस आणि त्रिशा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आयडेंटिटी चित्रपटाद्वारे पुन्हा सिनेसृष्टीत परतली. गेल्या काही वर्षांत, तिने ‘ममी अँड मी’, ‘सॉल्ट एन पेपर’, ‘बेस्ट ऑफ लक’, ‘अरावन’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ कल्लन’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर तिने टॉक विथ आर्ची, एन्टे प्रिया गणंगल, ब्लडी लव्ह आणि ट्रॅव्हल सारख्या शोमध्ये टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं.

दरम्यान, अर्चना कवीचा दुसरा पती रिक वर्गीस याच्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. तो कोची येथील उद्योजक आहे. तसेच तो मीडिया आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित आहे, असं काही अहवालांमध्ये म्हटलं आहे.