कॅनेडियन अभिनेत्री लिसा रे ही ‘कसूर’, ‘नेताजी’, ‘वॉटर’, ‘९९ साँग्स’ अशा अनेक चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनयाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
लिसा रे ही कर्करोगाचा सामना करीत होती. तिने केमोथेरपीही घेतली आहे. त्याचा परिणाम म्हणून तिला वेळेआधीच मेनोपॉज (रजोनिवृत्तीचा)चा सामना करावा लागला. लिसाने सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली. तिने सोशल मीडियावर लिहिले की, तिला ३७ व्या वर्षी मेनोपॉजचा सामना करावा लागला.
तिनेही असेही लिहिले की, जेव्हा मला मल्टिपल मायलोमा हा रक्ताचा कर्करोग झाला होता. तेव्हा मला कमी काळजी होती. पण, जेव्हा मी कर्करोगातून बरे झाली तेव्हा ३७ व्या वर्षी मेनोपॉज का आला, याकडे मी लक्ष द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी माझ्याबरोबर बोलण्यासाठी कोणीही नव्हते. मेनोपॉज व मेनोपॉजमुळे होणारे आजार याकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते. आता वयाच्या ५३ व्या वर्षी तिने याबाबत बोलण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेआधीच मेनोपॉज येणाऱ्या सर्व महिलांसाठी तिने बोलण्याचा निर्णय घेतला असल्याचे लिसाने म्हटले.
केमोथेरपीमुळे होणारा मेनोपॉज म्हणजे काय?
केमोथेरपीमुळे होणारा मेनोपॉज अनेक महिलांचे आयुष्य बदलणारा आहे, असे गुडगाव येथील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या संचालक डॉ. चेतना जैन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
डॉक्टर जैन सांगतात की, केमोथेरपीचा केवळ कर्करोगाच्या पेशींवरच परिणाम होत नाही, तर निरोगी पेशींनादेखील त्याची झळ पोहोचते; ज्यामध्ये अंडाशयातील पेशींचाही समावेश आहे. परिणामी, अंडाशय इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांसारखे हार्मोन्स तयार करणे थांबवते. त्यामुळे महिलांना अचानक मेनोपॉजचा सामना करावा लागतो.
या स्थितीला आयट्रोजेनिक मेनोपॉज (Iatrogenic Menopause ) म्हणतात. काहींमध्ये हा बदल तात्पुरता असतो; तर काही महिलांमध्ये विशेषतः ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हा बदल कायमस्वरूपी असू शकतो. ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना योग्य उपचारानंतर मासिक पाळी परत येण्याची शक्यता जास्त असते.
केमोथेरपीमुळे जर मेनोपॉज आला, तर त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. रात्री घाम येणे, मूड स्विंग होणे, थकवा ही लक्षणे जाणवतात. त्याबरोबरच याचा भावनिक परिणामदेखील होतो. विशेषत: अशा तरुण महिला ज्यांना पुढील १० वर्षांत मेनोपॉज येणार नाही, असे वाटते. त्यांना वेळेआधीच जेव्हा मेनोपॉजचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांच्यावर मोठा भावनिक परिणाम होतो.
डॉ. जैन म्हणतात की, अशा काळात तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञ मदत करू शकतात. तसेच या काळात काय काळजी घेतली पाहिजे, यावर मार्गदर्शन घेतले पाहिजे, जे स्त्रीरोग तज्ज्ञ करू शकतात.