अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिने मालिका, चित्रपट आणि नाटक या विविध माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर आता मुक्ता आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. स्टोरीटेल या मराठी अॅपवर ‘Virus-पुणे’ नावाच्या सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाार आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुक्ता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच मुक्ताने इन्स्टाग्रामवर याबाबतच्या काही पोस्ट शेअर केल्या आहेत. मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मुक्ताने इन्स्टाग्राम एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय.”

“मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? व्हायरस पुणे season 2. उद्या येतंय”, असे मुक्ता बर्वे म्हणाली.

त्यासोबतच मुक्ताने स्टोरीटेलची एक पोस्टही शेअर केली आहे. यात तिने म्हटले, “व्हायरस परत आलाय!!! नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये.
आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ऐका व्हायरस पुणे ह्या जबरदस्त थ्रिलर सिरीजचा दुसरा सिझन. व्हायरस पुणे – सिझन 2, मुक्ता बर्वेच्या आवाजात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘Virus-पुणे’ या मुक्ताच्या सीरीजला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान मुक्ता ही लवकरच ‘वाय’ या चित्रपटात झळकणार आहे. वाय हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. वाय या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.