अभिनेत्री रेखा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या सौंदर्याने आजवर अनेकांनाच घायाळ केले आहे. पण, रेखा यांनी नुकतेच अनेकांना थक्क केले आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या एका संवादाने. आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये रेखा यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या रुपाने अनेकांचेच लक्ष वेधले होते. सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केलेल्या रेखा यांनी यावेळीही भांगात कुंकू भरले होते. त्यावेळी अनेकांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावेळी ‘दंगल’च्या पार्टीमध्ये अभिनेत्री सनी लिओनी आणि विविध सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

रेखा विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्या तरीही प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र त्या शब्द सांभाळूनच वापरतात. ‘दंगल’च्या सक्सेस पार्टीमध्ये रेखा यांना प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांची प्रतिक्रिया देण्यास सांगितले तेव्हा रेखा काही वेळ हसत तेथेच शांतपणे उभ्या राहिल्या. त्यानंतर पुढे जाताजाता त्यांनी पुटपुटलेल्या त्या संवादाने अनेकांनाच थक्क केले. रेखा यांनी प्रसारमाध्यमांच्या येथून जाताना खोडकरपणे अमिताभ यांचा ‘आज खुश तो बहुत होंगे तुम..’ हा संवाद म्हटला. अमिताभ बच्चन यांचा हा संवाद रेखा यांच्या तोंडून ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

रेखा यांच्या बोलण्यातून अमिताभ बच्चन यांचा उल्लेख होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या विविध चर्चासुद्धा काही नवीन नाहीत. त्यामुळे आता ‘आज खुश तो बहुत होंगे तुम’ असं म्हणत रेखा यांना नेमकं म्हणायचं तरी काय होतं याचाच अंदाज सर्वजण बांधत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी जोड्यांमध्ये आणि बहुचर्चित प्रेमप्रकरणांमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाची चर्चा नेहमीच सुरु असते.