मराठी भाषा… हा काही दिवसांपासून राज्यभरातला चर्चेचा मुद्दा आहे. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर काढल्यानंतर मोठा वाद उफाळून आला. तीव्र विरोधामुळे हा जीआर रद्दही झालाच; पण मराठी भाषेचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. हिंदीच्या सक्तीवर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हिंदी इंडस्ट्रीमधीलही काही मोजक्या कलाकारांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता मराठी-हिंदी भाषावादाबद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना हिंदी-मराठी या भाषेच्या वादाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेणं आणि त्याचा आदर केला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
InControversial with Pooja Chaudhri या पॉडकास्टमध्ये रेणुका शहाणेंनी असं म्हटलं, “तुम्ही जर एखाद्या ठिकाणी खूप काळ राहत असाल, तर तिथली स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेणं आणि त्याचा आदर करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त भाषा बोलणं महत्त्वाचं नाही, तर तिथल्या भाषा आणि संस्कृतीबद्दल आदराची भावना असणंही आवश्यक आहे.
रेणुका शहाणे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे त्या म्हणतात, “जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीला महत्त्व देत नाहीत, स्वीकार करत नाहीत किंवा ते करायची त्यांना गरज वाटत नाही, असे लोक मला आवडत नाहीत.” त्यानंतर रेणुका शहाणेंनी भाषेवरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दलही आपलं मत व्यक्त केलं.
त्याबद्दल त्या म्हणाल्या, “मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. कोणालाही रागानं मारहाण करणं हे भाषेच्या हिताचं नाही. एखाद्या भागात मराठी न बोलणाऱ्या लोकांवर हात उचलणं, दोन-तीन लोकांना मारणं यांमुळे मराठी भाषेला काही फायदा होणार नाही.”
दरम्यान, रेणुका शहाणेंचे पती व अभिनेते आशुतोष राणा यांनीसुद्धा नुकतीच ‘हीर एक्स्प्रेस’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चवेळी मराठी भाषेबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी, “माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोचीही मातृभाषा मराठी आहे” असं म्हटलं. तसंच “भारत देश संवादावर विश्वास ठेवतो, तो कधीही वादावर विश्वास ठेवत नाही,” असंही म्हणाले.