यावर्षीची दिवाळी तिहेरी आनंद देणारी आहे. सर्वप्रथम म्हणजे, दिवाळीच्या दिवशीच माझी भूमिका असणाऱ्या ‘स्टेपनी’ या विनोदी चित्रपटाचा मुहूर्त होत असून, सलगपणे चित्रीकरणाने हा चित्रपट डिसेंबरमध्ये पूर्णदेखील होईल. दिवाळी पाहटमध्ये मी लावणी आणि कथ्थक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम साकारत आहे. तसेच या दिवाळीतच माझी भूमिका असणाऱ्या ‘शासन’ या राजकीय पार्श्वभूमीवरच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे. विशेष म्हणजे, २००२ साली ‘चालू नवरा भोळी बायको’द्वारे भरत जाधवची नायिका म्हणून या क्षेत्रात प्रेवश केला, त्यानंतर इतक्या वर्षानंतर मी भरतसोबतच ‘शासन’ आणि ‘स्टेपनी’ या दोन मराठी चित्रपटातून भूमिका साकारत आहे. दिवाळीनंतर वाराणसी आणि बनारस येथे मी गंगा महोत्सवासाठी जाणार आहे. एकूण काय दिवाळी मला बरेच काही देणारी आहे हे निश्चित. एक्साईटमेंटने ती भरली आहे असे म्हणूया.
शब्दांकन – दिलीप ठाकूर