आदित्य चोप्रा पुन्हा दिग्दर्शनाकडे!

‘यशराज प्रॉडक्शन’चा सर्वेसर्वा म्हणून निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राने आपला व्याप सगळा इतका वाढवून ठेवला आहे

‘यशराज प्रॉडक्शन’चा सर्वेसर्वा म्हणून निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राने आपला व्याप सगळा इतका वाढवून ठेवला आहे की, त्या कामातून बाहेर पडून तो पुन्हा दिग्दर्शन करायला तयार होईल, हा विचारच त्याच्या निकटवर्तीयांनी सोडून दिला होता. खुद्द त्याची पत्नी अभिनेत्री राणी मुखर्जीनेही या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही, असे मुलाखतीदरम्यान सांगितले होते. निर्माता-लेखक म्हणून यशराजच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या आदित्य चोप्राने सात वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शक म्हणून नव्वदच्या दशकात सुरुवात केली. १९९५ साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा पहिला चित्रपट त्याने दिग्दर्शित केला. शाहरुख आणि काजोल या जोडीला घेऊन केलेला हा चित्रपट अजूनही तितकाच लोकप्रिय आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याने मित्र करण जोहरला एक छोटी भूमिका देऊ केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’नंतर करण जोहरने दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली आणि तो झटपट पुढे गेला. आदित्य चोप्राने दिग्दर्शनापेक्षाही निर्मितीतच रमणे पसंत केले. आत्तापर्यंत दिग्दर्शक म्हणून त्याने तीनच चित्रपट केले आहेत तेही शाहरुखला घेऊन.. ‘दिलवाले..’नंतर पाच वर्षांनी त्याने ‘मोहोबते’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर थेट २००८ साली पुन्हा शाहरुखबरोबरच ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट त्याने दिग्दर्शित केला होता. आता सात वर्षांनी दिग्दर्शनाकडे परतत असताना त्याने आपल्या नव्या पिढीतील आवडत्या कलाकारांबरोबर काम करायचे ठरवले आहे. ‘बेफिक्रे – दोज हु डेअर टु लव्ह’ असे आदित्य चोप्राच्या चित्रपटाचे लांबलचक नाव असून यश चोप्रा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्याने आपल्या दिग्दर्शक म्हणून पुनरागमनाची घोषणा केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aditya chopra back to direction

ताज्या बातम्या