आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ हा हृतिकसाठी त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. सध्या ‘मोहेंजोदडो’च्या चित्रीकरणात तो व्यग्र असला तरी त्यानंतर पुढचा चित्रपट तो कोणता करणार?, याबद्दल इंडस्ट्रीत कमालीची उत्सुकता आहे. विशेषत: दोन वर्षांपूर्वी ‘बँग बँग’च्या चित्रीकरणादरम्यान एकापाठोपाठ एक दोन चित्रपट त्याच्याकडे होते. शेखर कपूरचा ‘पानी’ आणि करण जोहरचा ‘शुद्धी’. मात्र, ‘बँग बँग’ संपता संपता हे दोन्ही चित्रपट त्याच्या हातातून निसटले. त्यावेळी जुना मित्र आशुतोषने विश्वास दाखवत ‘मोहेंजोदडो’ त्याच्याकडे सोपवला. आशुतोषच्या चित्रपटानंतर हृतिकने पुन्हा एकदा यशराज बॅनरच्या चित्रपटाला पसंती दिली आहे.
यशराज प्रॉडक्शनबरोबर हृतिकने २००६ मध्ये ‘धूम २’ केला होता. त्यात त्याने चोराची भूमिका केली होती. मात्र वेगवेगळे अवतार धारण करत मौल्यवान गोष्टी पळवणाऱ्या या अट्टल चोराने सगळ्यांची मने जिंकली होती. हृतिकमुळे ‘धूम २’ला अमाप यश मिळाले. मात्र त्यानंतर हृतिकने यशराजचा चित्रपट केला नव्हता. आता नऊ वर्षांनी पुन्हा एकदा हृतिक रोशन आणि यशराज प्रॉडक्शन हे समीकरण जुळून आले असून याही चित्रपटात हृतिक चोराच्याच भूमिकेत दिसणार आहे. ‘धूम ३’चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यशराजच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून यात हृतिक मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
‘मोहेंजोदडो’चे चित्रीकरण पूर्ण होत आले असल्याने हृतिकच्या आगामी चित्रपटाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. हृतिकचा हाही चित्रपट ‘धूम २’ प्रमाणे अ‍ॅक्शनपॅड असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट ‘पिरीअड ड्रामा’ असणार आहे. यात हृतिक चोराच्याच भूमिकेत दिसणार असून या प्रेमपटात दीपिका पदुकोण त्याची नायिका असणार आहे. वेगळा दिग्दर्शक, पिरीअड ड्रामा आणि हृतिक-दीपिका ही याआधी पडद्यावर न आलेली जोडी अशी अफलातून भट्टी या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने जमली आहे. दीपिका सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काम करते आहे. तिचे पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित झाले असल्याने लगेचच या नव्या चित्रपटाची सुरुवात होऊ शकणार नाही. मात्र चित्रपटाची निर्मितीपूर्व तयारी सुरू झाली असून या वर्षांअखेरीस चित्रीकरणाला सुरुवात होईल, असा यशराज प्रॉडक्शनचा अंदाज आहे.