‘बाहुबली’नंतर संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय होणारा चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १’. कन्नड चित्रपटसृष्टीतला हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट कन्नडसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूश करत बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. चित्रपटामध्ये रॉकीचे पात्र साकारणारा अभिनेता यश ग्लोबल स्टार झाला. काही महिन्यापूर्वी चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. केजीएफ चॅप्टर २ने देखील बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य कलाकारांसह संजय दत्त आणि रवीना टंडन असे बॉलिवूडमधले कलाकारसुद्धा दिसले.

‘केजीएफ’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कन्नड चित्रपटसृष्टी काहीशी डबगाईला आली होती. या चित्रपटाच्या यशामुळे कन्नड चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाली. या चित्रपटसृष्टीमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’ नंतर पुनीत राजकुमारचा ‘जेम्स’, किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोना’ आणि रक्षित शेट्टीचा ‘७७७ चार्ली’ असे काही सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. नुकताच उपेंद्र आणि किच्चा सुदीप यांच्या ‘कब्जा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरवरुन हा चित्रपट केजीएफसारखी लोकप्रियता मिळवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘कब्जा’ या चित्रपटाची पार्श्वभूमी स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये किच्चा सुदीप आणि उपेंद्र अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीच्या काही सीन्समध्ये देशातल्या गरीबीचे प्रतिकात्मक वर्णन केले आहे. त्यावरुन चित्रपटाचा नायक दारिद्रयातून उठून गुन्हेगारीच्या मार्गाला लागला असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची रंगरेषा काहीशी डार्क पद्धतीची आहे. तसेच हा चित्रपट अ‍ॅक्शन सीन्सनी भरलेला असल्याचा अंदाज टीझरवरुन लावला जात आहे. या चित्रपटामध्ये श्रिया सरणची महत्त्वाची भूमिका आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच नेटीझन्स या चिपटाची तुलना ‘केजीएफ’ शी करत असल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही चित्रपटांमध्ये बऱ्याचशा गोष्टी समान असल्याचेही म्हटले जात आहे.

आणखी वाचा – दाक्षिणात्य स्टार प्रभास आणि क्रिती करतायत एकमेकांना डेट, चर्चांना उधाण

आर चंद्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यात आहे.