भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोमवारी (२३ जानेवारी) विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत के.एल.राहुल व अथिया शेट्टी यांनी सप्तपदी घेतली. लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टी खूप खूश असल्याचं दिसत आहे. तसेच त्याने जावयाचेदेखील कौतुक केलं आहे.
अभिनेता सुनील शेट्टी गेली अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. नुकतीच त्याची धारावी बँक ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्याने के.एल.राहुलबद्दल भाष्य केलं आहे. तो असं म्हणाला, “मला सासऱ्याची भूमिका काय असते हे माहित नाही. मी त्याचा एका चाहता आहे. पण आता आमच्यात एक नातं आहे. राहुलसारख्या नव्या पिढीचे टॅलेंट मला आवडतं. मी असा माणूस आहे जो नव्या तरुण पिढीचं टॅलेंट नेहमीच बघतो मग अगदी तो नवखा अभिनेता असला तरी, तरुणांचे खेळ पाहण्यासाठी मी वानखडेला जात असे. जेव्हा मी राहुलला खेळताना पाहिले तेव्हा मला वाटले की हा मुलगा चांगला आहे.”
तो पुढे म्हणाला, “राहुल माझ्याच गावचा आहे, तो मंगळुरूचा आहे. लहान शहरांतील मुलांनी जे काही साध्य केले त्याचा मला खूप अभिमान वाटतो, म्हणून मी त्याचा चाहता आहे. आणि आज मी त्याचा पिता आहे. मी त्याला जितके ओळखतो तितकेच तो स्वतःला, त्याच्या प्रत्येक हालचालीला ओळखतो.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
अथिया व के.एल.राहुल अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चाहत्यांसह बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.