ऐश्वर्या राय बच्चन लवकरच ‘फॅनी खान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार रावही दिसणार. पण या सिनेमात ऐश्वर्याने इन्टिमेट सीन करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तिच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात ऐश्वर्याने अभिनेता रणबीर कपूरसोबत अनेक इन्टिमेट सीन दिले होते.

तिच्या या इन्टिमेट सीनमुळे सासरे अमिताभ बच्चन हे फार नाराज झाले होते असे समजते. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आता ऐश्वर्याने ‘फॅनी खान’मध्ये राजकुमार रावसोबत इंटिमेट सीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या तिच्या प्रत्येक सीनबाबत सजग आहे. त्यामुळेच इंटिमेट सीनशी निगडीत प्रश्न तिने याआधीच दिग्दर्शकाला विचारला आहेत. अनिल कपूर यांनी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली असून राजकुमार राव ‘न्युटन’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. लवकरच हे तिघं एकत्र कथेचे वाचनही करणार आहेत.

‘फॅनी खान’मध्ये ऐश्वर्या आपल्याहून १० वर्षे लहान राजकुमारसोबत दिसणार आहे. या सिनेमाबद्दल बोलताना राजकुमार म्हणाला की, ऐश्वर्याची आणि त्याची पहिली भेट मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली होती. या महोत्सवात रावला ट्रॅप्ड सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कलाकाराचे पारितोषिक मिळाले होते.

करण जोहरचा हिट रोमॅण्टिक सिनेमा ‘ऐ दिल है मुश्किल’ यामध्ये ऐश्वर्या दिसली होती. एका मुलाखती दरम्यान, ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर ब्रेक घेऊन मी आनंदी असून, आता मला खासगी आयुष्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ऐश्वर्याने म्हटले होते. एप्रिल महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले. पण, आता ती पुन्हा तिच्या कामाकडे वळण्यासाठी सज्ज झाली आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने महत्त्वपूर्ण भूमिका करण्याकडे प्राधान्य दिले होते. तिने ‘जझ्बा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या सिनेमांत अभिनयाची चुणूक पुन्हा दाखवून दिली. ‘जझ्बा’ आणि ‘सरबजीत’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अयशस्वी ठरले तरी यातील ऐश्वर्याच्या कामाची आणि तिने स्वीकारलेल्या भूमिकांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली होती.