१९९४ हे वर्ष भारतासाठी खास होते. अभिनेत्री सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आणि ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली. त्याच वर्षी फेमिना मिस इंडियामध्ये सुष्मिताने ऐश्वर्या राय बच्चनचा पराभव केला. मिस इंडिया स्पर्धेदरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्तही आले होते. खरंतर, मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी ऐश्वर्या राय आधीच एक मोठी स्टार होती, त्यामुळे सुष्मिताला असे वाटायचे की मिस इंडिया स्पर्धेचे आयोजक ऐश्वर्याला पाठिंबा देत आहेत.

आता प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी ऐश्वर्या रायच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. विकी लालवानीशी झालेल्या संभाषणात प्रल्हाद कक्कर यांनी खुलासा केला की, ऐश्वर्याचं इंग्रजी चांगलं नव्हतं म्हणून ती मिस इंडिया स्पर्धेत हरली.

प्रल्हाद म्हणाले, “दोघांमध्ये अशी कोणतीही दुश्मनी नव्हती. वास्तविकता अशी होती की, ऐश्वर्याने नुकतीच तिची कारकीर्द सुरू केली होती आणि तिचं इंग्रजी चांगलं नव्हतं, तर सुष्मिता सेन, कॉन्व्हेंट स्कूलमधून आली होती. ऐश्वर्या रायच्या बाबतीत असे नव्हते, म्हणून जेव्हा इंग्रजीमध्ये परफॉर्म करायचे असते आणि ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही त्यांचे नुकसान होते, म्हणूनच सुष्मिताने प्रश्नोत्तर फेरी जिंकली.”

सुष्मिता का रडत होती?

प्रल्हाद पुढे म्हणाले, “मला आठवतंय, मी चेंजिंग रूममध्ये गेलो होतो आणि सुष्मिता एका कोपऱ्यात रडत होती. मी तिला विचारलं, ‘काय अडचण आहे?’ ती म्हणाली, ‘सर्व काही ठीक आहे. मी कधीच जिंकणार नाही.’ मी म्हणालो, ‘तू मूर्ख आहेस का? ज्युरीकडे बघ. तुला वाटतं की कोणी त्यांना फिक्स करू शकेल? मूर्ख बनू नकोस. लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नकोस. जर तू पात्र असशील तर तुला ते मिळेल, कारण ज्युरी खूप शक्तिशाली आहे. तू त्यांना विकत घेऊ शकत नाहीस.” सुष्मिताने तिच्या विजयानंतर प्रल्हाद यांना फोन केला होता.

२१ मे १९९४ रोजी अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकत भारतीयांची मान उंचावली होती. तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता ही पहिली भारतीय महिला ठरली होती.