लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने २५व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. आकांक्षाने रविवारी(२६ मार्च) हॉटेलमध्ये आत्महत्या करत जीवन संपवलं. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. आकांक्षाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, आकांक्षाच्या आईने भोजपुरी गायक समर सिंहला तिच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे.
आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आकांक्षाच्या आईने प्रसिद्ध भोजपुरी गायक व अभिनेता समर सिंहवर मुलीची हत्या केलाचा आरोप केला आहे. समर सिंह व त्याच्या भावाने आकांक्षाची हत्या केल्याचं तिची आई मधु दुबे यांचं म्हणणं आहे. “समर सिंह व त्याचा भाऊ संजय सिंहने आकांक्षाकडून तीन वर्ष काम करुन घेतलं. तिचं कोटी रुपयाचं मानधन त्याने दिलेलं नाही. २१ मार्चला समर व त्याच्या भावाने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत तिने आम्हाला फोनवर सांगितलं होतं”, असं आकांक्षाची आई म्हणाली.
दरम्यान, आकांक्षा व समर सिंह रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोघांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नात्याबद्दल खुलासा केला होता अशी चर्चा आहे. गेल्या महिन्यात आकांक्षा दुबेने तिच्या सोशल मीडियावर समर सिंहबरोबरचा फोटो शेअर केला होता. या दोघांनी अनेक भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे.
हेही वाचा>> आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेली पोस्ट, निधनानंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
आकांक्षाच्या हॉटेलमधील रुममध्ये कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.