Court summons to Akshay Kumar and Arshad Warsi: “कौन है ये लोग, कहा से आते है…”, या डायलॉगमुळे जॉली एलएलबी हा चित्रपट अनेकांच्या लक्षात राहिला. आजही या चित्रपटातील मिम्स व्हायरल होत असतात. जॉली एलएलबी चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग आले असून लवकरच तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यावर आता आक्षेप घेतला जात आहे. १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविरोधात पुणे न्यायालयाने समन्स बजावले आहे.
पुण्यातील वकील वाजीद खान (बिडकर) आणि गणेश म्हस्के यांनी चित्रपटाच्या टीझरवर आक्षेप घेतला आहे. टीझरमधून न्यायाधीश आणि वकिलांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल वकिलांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेची गंभीर दखल घेत १२ वे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी अभिनेते आणि चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांना समन्स बजावत २८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
जॉली एलएलबी ३ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. पुढील महिन्यात प्रदर्शन असताना आता जॉली एलएलबी चित्रपटाने आता वाद निर्माण केला आहे.
टीझरमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे वकिलाचा गणवेश घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. यावर आता वाद निर्माण झाला आहे. या टीझरमुळे वकिलांची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या चित्रपटातील वकील न्यायाधीशांना मामू म्हणून संबोधतात, हा न्यायव्यवस्थेचा अवमान आहे, असे वाजिद खान यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले.
वाजिद खान यांनी पुढे म्हटले की, चित्रपटात वकील न्यायालयात अशाप्रकारे वाद घालताना दाखवले जातात जणू काही ते कौटुंबिक भांडण आहे. चित्रपट म्हणून काही लिबर्टी असली तरी यामुळे संपूर्ण विधी क्षेत्रातील चुकीचा समज निर्माण होत आहे.