अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशी’. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचं प्रदर्शन थांबलेलं आहे. येत्या ३० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र आता पुन्हा हे प्रदर्शन स्थगित करण्यात आलं आहे.
काल या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दलची घोषणा केली. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षी २४ मार्चलाच प्रदर्शित होणार होता. मात्र करोना महामारी आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे हे प्रदर्शन लांबणीवर पडलं. आता वर्ष झालं तरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही मुहुर्त मिळत नाही.
View this post on Instagram
निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रदर्शन पुढे ढकलण्याचा हा निर्णय घेतला आहे. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी रोहितच्या प्रदर्शन पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं कौतुक केल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अक्षय कुमार याला करोनाची लागण झाल्याचं रविवारी समोर आलं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सिंबा’ यानंतर पोलीसांवर आधारित चित्रपटांच्या मालिकेतला ‘सूर्यवंशी’ हा रोहितचा चौथा चित्रपट आहे.