scorecardresearch

फ्लॅशबॅक : “अलबेला”चे दिवस…

“अलबेला” मुख्य प्रवाहातील इंपिरियल चित्रपटगृहात झळकला.

फ्लॅशबॅक : “अलबेला”चे दिवस…

dilip thakurभगवानदादा याना स्टंटपटाकडून सामाजिक चित्रपटाकडे वळवण्यात “अलबेला” (१९५१) हा चित्रपट व त्यातील गीत-संगीत-नृत्ये यांची लाेकप्रियता यांचा खूपच महत्वाचा वाटा आहे व दादांच्या नेमक्या याच प्रवासावर आधारीत “एक अलबेला” हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. या निमित्ताने या चित्रपटाबाबतच्या काही गाेष्टी सांगणे याेग्य ठरेल. अलबेला निर्माण करेपर्यंत दादांचे चित्रपट ग्रॅन्ट राेडच्या पीला हाऊस भागातील ताज, निशात, न्यू राेशन, दाैलत अशा चित्रपटगृहात झळकत. “अलबेला” मात्र मुख्य प्रवाहातील इंपिरियल चित्रपटगृहात झळकला. गीता बालीने या चित्रपटात दादांसाेबत भूमिका साकारली हे विशेषच.

भगवानदादा व “भाेली सूरत दिल के खाेटे” यांच्या अफाट लाेकप्रियतेचे किस्से एवढ्या वरच थांबत नाहीत तर १९७६ साली “जवळ ये लाजू नकाे” या नावाचा चित्रपट आला हाेता. त्यात एका दृश्यात हाॅटेलमधील रेडियाेवर हे “भाेली सूरत दिल के…” गाणे लागते ते एेकून भगवान दादा व मधु आपटे, बबन प्रभु नाचू लागतात. अर्थात आता भगवानदादांची चरीत्र नायक अशी वाटचाल सुरू हाेती. १ आॅगस्ट १९१३ ही भगवान दादांची जन्म तारीख हाेय. तर ४ फेब्रुवारी २००२ साली म्हणजे वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एका साध्या मध्यमवर्गीयाच्या घरात जन्माला आलेल्या या कलंदराचे नाव भगवान आबाजी पालव. शिक्षणात विशेष रूची नसणारे दादा मनाेरंजक चित्रपट पहाण्यास विशेष रस घेत. तेव्हा ते दादर-नायगांव परिसरात राहात.

भगवान दादानी आयुष्य व चित्रपट कारकिर्दीत खूपच उतार चढाव पाहिेले. त्यातूनच ते घडले. अभ्यासात त्याना विशेष रस नसल्यामुळे त्यांना वडिलांची बाेलणी खावी लागत. १९३० साली म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी त्याना निर्माता सिराज अली हकीम याच्या “बेवफा” या मूकपटात काँमेडियनची छाेटीशी भूमिका मिळाली. दादांसाठी ही खरे तर सुखद गाेष्ट हाेती. त्यानंतर त्यानी “दाेस्ती”, “तुम्हारी कसम”, “शाैकिन” अशा काही मूकपटात छोट्या छोट्या भुमिका साकारल्या. १९३६ साली त्यांना “हिम्मत ए मर्दा” या चित्रपटात संधी मिळाली व ते मूकपटातून बोलपटाकडे आले. हिच त्यांची पहिली ओळख.

याच टप्प्यावर ते मास्टर भगवान म्हणून आेळखले जाऊ लागले. “मतलबी”, “लालच”, “मतवाले”, “बदला” अशा काही छोट्या बजेटवाल्या अॅक्शनपटात त्यानी तेव्हा भूमिका साकारल्या. त्यासाठी त्यांना त्यांच्या काहीशा कुस्तिबाज व्यक्तिमत्वाचा फायदा झाला. त्यानी मग स्वतःच्या “जागृती फिल्म” व “भगवान आर्टस प्राँडक्शन” अशा दाेन चित्रपट निर्मिती संस्थांची निर्मिती केली व “जालान”, “क्रिमिनल”, “भेदी बंगला” अशा चित्रपटांची निर्मिती व काहींचे दिग्दर्शन केले. एकदा शाेमन राज कपूरची मा. भगवान यांच्याशी भेट झाली असता त्याने दादाना प्रेमाचा सल्ला देत म्हटलं की अशा अॅक्शनपटात रमण्यापेक्षा सामाजिक चित्रपटांची निर्मिती करावी. दादांनी हे खूपच मनावर घेतले. त्यामुळे दादानी “अलबेला” निर्माण करण्यात विशेष रस घेतला. “अलबेला” पासून भगवान दादांचे सगळेच आयुष्य बदलून गेले. “अलबेला”नंतर काही काळाने त्यांचे आयुष्य नेमक्या कोणत्या दिशेने गेले याबाबात बऱ्याच कथा-दंतकथा प्रसिध्द आहे.

सत्तच्या दशकात हाच “अलबेला” तिसऱ्या-चौथ्या “रिपिट रन”ला प्रदर्शित करण्यासाठी नकलाकार आणि पत्रकार रणजित बुधकर यांनी आपल्या “चित्र खजिना” या वितरण संस्थेतर्फे अधिकार घेतले आणि मॅटनी शोला तो पुन्हा प्रदर्शित केला. खरतर हा कालखंड राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या विलक्षण चलतीचा, तरीदेखील “अलबेला”कडे तात्कालिक प्रेक्षक पुन्हा वळला. “चित्र खजिना”च्यावतीने तो बऱ्याच ठिकाणी नियमीत अथवा सकाळच्या मॅटनीच्या खेळाला प्रदर्शित होऊ लागला होता. अर्थात त्यातील गाण्यांची मोहनी हेच या काळात मोठे आकर्षण होते आणि भगवान दादांची विशिष्ट्य नृत्यशैलीदेखील पसंत पडली.

एखाद्या चित्रपटाचा १९५१ साली सुरू झालेला प्रवास मग कळत नकळतपणे नवे मार्ग सापडत वा शाेधत असादेखिल प्रवास करताे हेच विशेष. “अलबेला” मधील “भाेली सुरत दिल के खाेटे” व “शाेला जाे भडके दिल मेरा धडके” ही गीते “एक अलबेला”मधे मंगेश देसाई व विद्या बालन यानी भगवानदादा व गीता बाली यांच्या रूपात साकारलीत हे तुम्हाला माहितच आहे. आजची पीढी इतक्या जुन्या गाण्यांसहीतच्या मनोरंजनाचे कसे स्वागत करते ते पाहायचे.
दिलीप ठाकुर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2016 at 07:05 IST

संबंधित बातम्या