Ali Fazal On Deepika Padukone 8 Hour Shift Demand : ग्लॅमरस चित्रपटसृष्टीत कोणत्याही कलाकारासाठी शूटिंगसाठी निश्चित वेळ नसते. कामानुसार, काहींना १२ तास, तर काहींना २४ तास शूटिंग करावे लागते.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला. अभिनेत्रीने त्यानंतर ‘स्पिरिट’ सिनेमा सोडल्याचेही समोर आले होते. कामाच्या शिफ्टवरून हा वाद सुरू झाला होता.

दीपिकाने चित्रपटासाठी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. परंतु, दिग्दर्शकाला ती मान्य नसल्याने अभिनेत्रीने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी याबद्दल त्यांची मतं मांडली होती. काजोल, अजय देवगण व सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींनी दीपिकाला पाठिंबा दिला; परंतु काहींनी राजनयिक प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता अली फजलनेही याबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आता मिर्झापूरचे गुड्डू भैया म्हणजेच अली फजलनेही आठ तासांच्या शिफ्ट वादावर आपले मत मांडले आहे. तो म्हणतो की,अ‍ॅक्टिंग हा काही कॉर्पोरेट जॉब नाही. स्क्रीनशी बोलताना अली फजल म्हणाला, “मी सर्वांनी समाधानी राहावे याच्या बाजूने आहे. शेवटी आपण क्रिएटर्स आहोत. हा कॉर्पोरेट जॉब नाही. त्यांना वाईट वाटू नये; पण ते तसे नाही. गोष्टी निर्माण करण्यासाठी खूप सहानुभूती आवश्यक आहे. अभिनेते, निर्माते आणि तंत्रज्ञ यांच्यात परस्पर संमतीने हे ठरवले गेले पाहिजे की, एखादा विशिष्ट प्रोजेक्ट किती तास चालेल?’

अली फजल पुढे म्हणाला, “कधी कधी काही प्रोजेक्ट्सना जास्त वेळ लागत नाही. कारण- ते VFX नी भरलेले असतात. काही प्रोजेक्ट्समध्ये अ‍ॅक्शन आणि ड्रामा यांचा समावेश असल्याने त्यांना जास्त वेळ लागतो. काम करण्याची पद्धत वा शैली बदलत असते. आपण या अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये आहोत. इतरांनी चर्चा करणे आणि त्यांचे मत देणे हे काम नाही. लोकांना बाजू घेण्यास सांगणे कठोर आहे; ते योग्य नाही.”

काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, दीपिका पादुकोणला संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. कारण- तिने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती आणि मानधनही जास्त मागितले होते. या चित्रपटात दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरीची भूमिका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.