गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या दुसऱ्या घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चर्चा सुरु असतानाच आता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा वादात सापडला आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचं शूटिंग सध्या लडाखमध्ये सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे तिथल्या ग्रामस्थांनी सिनेमाची टीम लडाखमध्ये प्रदूषण पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रिलीजपूर्वीच सिनेमावर वादाची टांगती तलवर फिरू लागली आहे.

सोशल मीडियावर एका युजरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लडाखमधील वाखा गावातील दृश्य पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्या परिसरात झालेलं प्रदूषण लक्षात येतंय. ज्यात गाड्यांमुळे झालेलं प्रदूषण, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि इतर वस्तू सगळीकडे पसरलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “ही भेट बॉलिवूड स्टार आमिर खानचा येणारा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ कडून लडाखच्या वाखा ग्रामस्थांना. आमिर खान स्वत: ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात प्रदूषणासंदर्भात मोठी मोठी वक्तव्य करतात. मात्र जेव्हा स्वत:ची वेळ असते तेव्हा हे असं असतं.”

काही दिवसांपूर्वीच लडामधील ‘लाल सिंह चड्ढा’ च्या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो समोर आला होता. या फोटोत घटस्फोट जाहीर केल्यानंतर आमिर आणि किरण राव पहिल्यांदा एकत्र काम करत असल्याचं पाहायला मिळालं. फोटोत आमिर आणि नागा चैतन्य मिलिट्री ड्रेसमध्ये दिसत होते.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा टॉम हॅक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमावर आधारित आहे. या सिनेमात नागा चैतन्य बुब्बा या भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमातील युद्धाच्या सीनची शूटिंग लद्दाखमध्ये सुरु आहे.