महानायक अमिताभ बच्चन यांना चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माफी मागावी लागली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये सचिन लेजेंड्स क्रिकेट लीग मध्ये खेळणार असल्याचे म्हटले होते. मात्र सचिन ही स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या मॅनेजमेंट टीमने दिले आहे. सचिन तेंडुलकरचा चुकीचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. अमिताभ यांनी ते ट्विट आणि व्हिडिओ डिलीटही केला आहे. यानंतर त्यांनी लेजेंड्स क्रिकेट लीगची एक नवीन व्हिडिओ क्लिपही शेअर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळणार असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, सचिन तेंडुलकरच्या व्यवस्थापनाने सांगितले की, सचिन हा दिग्गज या लीगचा भाग असणार नाही. यानंतर अमिताभ यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी व्हिडिओ डिलीट केला. त्यांनी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली.

सचिन तेंडुलकरची व्यवस्थापन कंपनी ‘एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ने स्पष्ट केले की सचिन तेंडुलकर आगामी ‘लेजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी)’ चा भाग नाही. क्रिकेटमधील निवृत्त खेळाडू एलएलसीमध्ये खेळतात. एसआरटी स्पोर्ट्सच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, सचिन ‘लेजेंड्स क्रिकेट लीग’मध्ये खेळत असल्याचे वृत्त खरे नाही. आयोजकांनी क्रिकेट चाहत्यांची आणि अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करण्यापासून दूर राहावे.

अमिताभ बच्चन यांनी नंतर एक नवीन व्हिडिओ शेअर केला. “लेजेंड्स लीग क्रिकेट टी-२० चा फायनल प्रोमो’. कोणाला त्रास झाला असल्यास क्षमस्व. चूक अनावधानाने झाली,” असे अमिताभ यांनी म्हटले आहे. त्यांनी हात जोडल्याचे इमोजीही सोबत दिला आहे.

दरम्यान, एलएलसीमध्ये तीन संघ असतील जे २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लीगमध्ये एकमेकांना सामोरे जातील. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अन्य खेळाडू करतील.

भारताच्या संघाचे नाव ‘द इंडिया महाराजा’ असे असेल. लीगमधील इतर दोन संघ उर्वरित जग आणि आशिया लायन्सचे आहेत. आशिया लायन्समध्ये शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल आणि असगर अफगाण हे खेळाडू आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan apologize after sachin tendulkar management advert on legends cricket league abn
First published on: 09-01-2022 at 11:15 IST