scorecardresearch

Loksatta Exclusive: अमिताभ बच्चन ‘ते’ सहा शब्द उच्चारत समीर चौगुलेच्या पाया पडायला गेले अन्…; ‘त्या’ व्हायरल फोटोची गोष्ट

केबीसीच्या सेटवरील हा फोटो काही आठवड्यांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता, पण नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?

samir choughule amitabh bachchan
अमिताभ यांना भेटण्यासाठी हास्यजत्राची टीम केबीसीच्या सेटवर गेली होती (फाइल फोटो)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे दोन शब्द वाचल्यानंतरच मराठी माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलतं एवढा हा सोनी मराठीवरील कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमामधील कलाकारच नाही तर त्यांनी साकारलेल्या भूमिका सुद्धा घरोघरी लोकप्रिय झाल्या आहेत. विशेष म्हणजे समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर यासारख्या जुन्या कलाकारांबरोबरच दत्तू मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, ओंकार भोजनेसहीत या कार्यक्रमातील नव्या कलाकारांनीही येथील भूमिकांच्या जोरावर आपला चाहता वर्ग निर्माण केलाय. या मालिकेच्या लोकप्रियतेची झलक काही आठवड्यांपूर्वी नव्याने ओधोरेखित झाली जेव्हा मालिकेतील सर्व कलाकार मंडळी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेले होते.

नक्की वाचा >> Loksatta Exclusive: “महाराष्ट्राची हास्यजत्राचं एक स्किट रोज पाहिलं पाहिजे”, अमिताभ यांचा अभिषेकला सल्ला; कारण वाचून वाटेल आश्चर्य

अमिताभ यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंबरोबरच या भेटीदरम्यानचा एक खास फोटो चांगलाच व्हायरल झाला होता, तो म्हणजे अमिताभ बच्चन समीर चौगुलेच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असल्याचा. या फोटोमागील गोष्ट आणि अमिताभ यांच्या या कृतीनंतर नेमकं काय घडलं होतं हे याच कार्यक्रमामध्ये हास्यवीर म्हणून सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’वरील विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असणारा ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने तो लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’च्या कट्ट्यावर चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी आला होता. चित्रपटाबद्दल बोलतानाच हास्यजत्रेचा विषय निघाला आणि कार्यक्रमात सतत हसतो त्याप्रमाणे अगदी मनमोकळेपणे या कार्यक्रमातील किस्से सांगू लागला. यावेळी त्याला हास्यजत्रेच्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांची भेट घेण्याची संधी मिळालेली त्याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस तो या भेटीबद्दल भरभरुन बोलला. भेटीदरम्यान कलाकारांची अवस्था काय होती, किती एक्साटमेंट होती अमिताभ यांना भेटण्याची याबद्दल प्रसादने भाष्य केलं.

“मी थरथरत होतो त्यांच्यासमोर उभा राहिल्यानंतर. पॅडी (पंढरीनाथ कांबळे) रडायला लागला होता. समीर असा अबबबब करत.. (थंडी वाजल्याप्रमाणे थरथरत) होता. आमची अवस्था बिकट होती फार,” असं त्या भेटीबद्दल बोलताना प्रसादने सांगितलं. पुढे बोलताना अमिताभ यांनी समीर चौगुलेचं खास कौतुक करताना त्याचा पाया पडल्याचं प्रसादने सांगितलं. समीरच्या पाया पडण्याआधी त्याला पाहता क्षणी अमिताभ काय म्हणाले आणि ते पाया पडल्यानंतर समीरची काय प्रतिक्रिया होती याबद्दलही प्रसादने भाष्य केलं.

“इतकं वॉर्म वेलकम केलं त्यांनी आमचं. ते समीरच्या पाया पडले तो खरा फोटो आहे. ‘आप का तो मैं क्या करु’ म्हणत त्यांनी खरं ते केलेलं आहे. लोकांना वाटलं की हा बनवलेला फोटो आहे तर अजिबात नाही,” असंही प्रसादने सांगितलं. “माणसं उगाच मोठी नाही होतं, आज बच्चनसाहेब ज्या पोस्टला आहेत, त्यांना आमचं कौतुक करायचं काहीच कारण नाही. त्यांनी नाही केलं तरी त्यांना नाही काही फरक पडत. पण त्यांचं जेश्चर आणि त्या भेटीमधील वॉर्म एकदम फॅण्टॅस्टीक होती,” असंही प्रसाद म्हणाला. अमिताभ बच्चन पाया पडायला आल्यानंतर समीर चौगुलेंची प्रतिक्रिया काय होती?, असा प्रश्न प्रसादला विचारला असता त्याने, “तो रडच होता. काही बोलतच नव्हता,” असं उत्तर दिलं. समीरच्या पाया पडण्यासाठी अमिताभ पुढे आले तेव्हा समीर मागे झाला. त्याने अमिताभ यांचे हात पकडले. मात्र अमिताभ यांच्या या कृतीने समीर एकदम गहिवरुन गेला आणि रडू लागला.

तसेच याच विषयावर बोलताना प्रसादने, आम्ही कलाकार तिथे पोहचण्याआधी अमिताभ बच्चन हे कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन मोटे, आणि सचिन गोस्वामी यांच्याशी बोलताना हे समोर बसतात त्यांना (प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर) तुम्ही रिअ‍ॅक्शन लिहून देता ना?, तर त्यांनी नाही, नाही. ते त्यांच्या एक्सटेम्पो रिअ‍ॅक्शन असतात. काहीही लिहून दिलेलं नसतं असं सांगितलं. “ते ऐकून अमिताभ बच्चन मला असं म्हणाले की, हे तुम्ही कसं बोलता. दर वेळेस नवी प्रतिक्रिया, त्यात पुन्हा पुन्हा तीच प्रतिक्रिया नाही बरं त्यावरही त्या मजेशीर असतात. बोलताना सर्वांचा मान राखला जातो. मी तुमच्या जागी असतो तर मला बोलता आलं नसतं. ही माझ्यासाठी फार मोठी कॉम्पिलमेंट होती,” असं प्रसाद म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amitabh bachchan touches the feet of maharashtrachi hasyajatra marathi actor samir choughule memory by prasad oak scsg

ताज्या बातम्या