‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र आता ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येण्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. यावरुनच मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात एक ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
२५ सप्टेंबर २०१७ पासून सुरु असणाऱ्या या मालिकेला लोकांनी अक्षरश: त्याला डोक्यावर उचलून घेतलं. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार असल्याचे समजते. त्यावरुनच राजकीय दबावाखाली ही मालिका बंद केली जाणार असल्याच्या चर्चांना सोशल नेटवर्किंगवर पेव फुटले आहेत. काही वेबसाईट्सवर यासंदर्भातील माहितीही पोस्ट करण्यात आली आहे. या लिंक व्हायरल झाल्यानंतर आता अमोल कोल्हे यांनीच ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी, “गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही,” अशी कॅप्शन दिली आहे.
फोटोमधील मजूकर काय?
“अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मिडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरुर टिप्पणी करावी,” असा मजकूर या फोटोवर आहे.
गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय
प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. pic.twitter.com/bpA8bNhHti
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020
दरम्यान, दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा शेवट नुकताच चित्रीत करण्यात आल्याचे वृत्त आहे. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते.