पूर्व शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे राजकीय आणि मनोरंजनविश्वात निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यानिमित्ताने बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय वर्तुळात बाळसाहेबांचा दबदबा होताच, पण मनोरंजनसृष्टीतील कित्येक कलाकारांशी त्यांचे अगदी घरच्यासारख संबंध होते.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी असंच एक ट्विट करत बाळासाहेब यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे, शिवाय जेव्हा जेव्हा अनिल कपूरचा नवा चित्रपट लागायचा तेव्हा बाळासाहेब त्यांना फोन करायचे याचासुद्धा अनिल कपूर यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “खिळवून ठेवणारा आणि…” दिग्दर्शक तिग्मांशु धूलियाची ‘गांधी गोडसे’ चित्रपट पाहून उत्स्फूर्त प्रतिक्रिया

या ट्वीटमध्ये अनिल कपूर यांनी बाळसाहेबांबरोबरचा एक जून फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर पोस्टमध्ये अनिल यांनी लिहिलं की, “जर निर्भीडपणाला चेहेरा असता तर तो नक्कीच बाळसाहेबांचा असता. ते काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत ज्यांची विनोदबुद्धी, विनम्रता आणि ताकद पाहून मला भरपूर प्रेरणा मिळायची. ते बऱ्याचदा मला फोन करायचे आणि म्हणायचे, अरे अनिल! तुझा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, अजून तू मला तो दाखवला नाहीस. मिस यु बाळसाहेब.”

अनिल कपूर यांच्या या भावपूर्ण पोस्टची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. अनिल कपूर ‘द नाइट मॅनेजर’ या वेबसीरिजच्या माध्यमातून लवकरच ओटीटीविश्वात पदार्पण करणार आहेत. या वेबसीरिजमध्ये त्यांच्याबरोबर शोभिता धूलीपाला, आदित्य रॉय कपूरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अनिल कपूर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.