अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असं अंकिताने म्हटलं आहे. याविषयी तिने एक मोठी पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीविषयीदेखील भाष्य केलं आहे.
“मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते. मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि कोणाला दोषीदेखील म्हटलेलं नाही. मी कायम माझ्या मित्रासाठी, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांची साथ देत आहे. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.
— Ankita lokhande (@anky1912) September 9, 2020
पुढे ती म्हणते, “अनेकांनी मला जाहीरपणे विधवा किंवा सवत असे म्हटलं, मात्र मी त्याचीही कधी उत्तरं दिली नाहीत. मी फक्त २०१६ पर्यंत त्याच्यासोबत काय काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला”.
दरम्यान, अंकिताने या पोस्टमध्ये रिया चक्रवर्तीलादेखील काही प्रश्न विचारले आहेत. जर तुझं इतकं प्रेम होतं तर त्याला ड्रग्स घेताना अडवलं का नाही?,असं अंकिताने विचारलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अंकिता लोखंडे सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त आहे. तसंच रियाला एनसीबीने अटक केल्यानंतरही तिने आनंद व्यक्त केला होता. मात्र आता तिने केलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.