अनुपम खेर सध्या प्रभासबरोबर हैदराबादमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. शनिवारी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी शूटिंगसाठी किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे दाखवले.
४० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी उघड केले की त्यांच्या कार ड्रायव्हरने त्यांना चुकीच्या ठिकाणी नेले, जिथे सगळीकडे जंगल होते; त्यामुळे आता त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी भिंतीवर चढावे लागले. अभिनेत्याने व्हिडीओला कॅप्शन दिले, “इकडून तिकडे! माझ्या ४० वर्षांच्या चित्रपट प्रवासात मी माझ्या शूटिंगच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश केला आहे! पण, आजचा दिवस केवळ वेगळाच नव्हता तर खूपच विनोदीही होता.
त्यांनी पुढे लिहिले, “हैदराबादमध्ये प्रभास स्टारर अनटाइटल्ड चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, माझ्या ड्रायव्हरने एका साहसी प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला. लवकरच आम्ही जंगलासारख्या भागात पोहोचलो आणि नंतर एका ठप्प ठिकाणी पोहोचलो. गाडी रिव्हर्स होऊ शकत नव्हती! पुढे काय झाले, कृपया येथे पाहा.”
व्हिडीओमध्ये ७० वर्षीय अभिनेता म्हणाले, “आज माझा ड्रायव्हर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे रस्ता विसरला; बघा, तो मला जंगलात घेऊन आला. माझे चित्रीकरण त्या बाजूला आहे. काय काय करावे लागते. आता युनिटचे लोक मला जंगलातून घेण्यासाठी आले आहेत, मला जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतील.”
प्रभास आणि अनुपम खेर हनु राघवपुडी दिग्दर्शित चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे अधिकृत शीर्षक अद्याप जाहीर झालेले नसले तरी चित्रपटाचे नाव ‘फौजी’ असे ठेवण्यात आले आहे.
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडस्ट्रीमध्ये ४१ वर्षे पूर्ण केली आहेत. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अनुपम खेर यांनी अनेक सुपरहिट चित्रपट आणि संस्मरणीय पात्रे दिली आहेत. अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर सध्या ते त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. नुकताच हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला, जिथे त्याला खूप कौतुक मिळाले. हा चित्रपट १८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.