Archana Puran Singh Net Worth : अर्चना पूरण सिंह या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही वर्षांपासून त्या कपिल शर्माच्या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहेत. अर्चना पूरण सिंह यूट्यूब व्लॉग्सद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. व्लॉग्समध्ये अर्चना अनेकदा त्यांच्या कुटुंबासह आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याची झलक दाखवतात.

नव्या व्हिडीओमध्ये अर्चना आपल्या कुटुंबासह मुंबईत पारंपरिक गुजराती थाळीचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. व्लॉगदरम्यान, अर्चना यांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि एकेक रुपया कसा महत्त्वाचा होता हे सांगितलं.

अर्चना पूरण सिंह यांनी या व्लॉगमध्ये सांगितले की, त्यांच्याकडे जेवणासाठी खिशात फक्त ११ रुपये होते. त्या १० रुपयांचा डोसा खायच्या आणि एक रुपया टीप द्यायच्या. हे ऐकून अर्चना पूरण सिंग यांची आर्यमान व आयुष्मान ही दोन्ही मुले आश्चर्यचकित झाली. त्यांनी त्यांच्या आईचे कौतुक केले. चाहत्यांनीही अर्चना यांच्या त्या व्लॉगवर कमेंट करायला सुरुवात केली आणि त्यांचा प्रवास व संघर्ष प्रेरणादायी असल्याचे म्हटले.

अर्चना पुढे म्हणाल्या, “प्रत्येकाला वाटते की, मी नेहमीच हसत असते; पण त्यांना माहीत नाही की, मी काय अनुभवले आहे. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मला कपडे कसे घालायचे ते माहीत नव्हते. मी शिक्षित होते; पण मला स्टाईल माहीत नव्हती. जेव्हा मी मुंबईत जीवन पाहिले तेव्हा मी डेहरादूनला परत आले आणि माझ्या वडिलांना सांगितले की, मला अभिनेत्री व्हायचे आहे. माझ्या वडिलांनी मला त्यांचे मित्र आणि त्यांच्या मुलीबरोबर फक्त एका सुटकेससह मुंबईला पाठवले; पण माझ्या वडिलांचा मित्र एका आठवड्यातच डेहराडूनला परतला.”

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अर्चना पूरण सिंह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसतात. त्या प्रत्येक एपिसोडसाठी १०-१२ लाख रुपये घेतात. त्यांना त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरूनही पैसे मिळतात. तसेच त्यांना चित्रपट आणि इन्स्टाग्रामवरूनही पैसे मिळतात. सध्या, अर्चना पूरण सिंह यांची एकूण संपत्ती २३५ कोटी रुपये आहे.

अर्चना पूरण सिंह यांनी १९८२ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसल्या. एकेकाळी त्यांना उदरनिर्वाहासाठी बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावे लागले.