scorecardresearch

ट्विटरवरुन होतेय जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी, वाचा नेमकं काय घडलंय

सोशल मीडियावर गायकाच्या विरोधात अटकेची मागणी होत आहे.

ट्विटरवरुन होतेय जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी, वाचा नेमकं काय घडलंय
त्याला ट्रोल करत अनेक युजर्सनी अटक करण्याची पोलिसांकडे मागणीही केली.

जुबिन नौटियाल बॉलिवूडच्या काही नावाजलेल्या गायकांमध्ये गणला जातो. पण सध्या त्याच्या विरोधात #ArrestJubinNautyal ट्विटरवर ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगवर हजारो ट्वीट करण्यात आले आहेत आणि प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. ‘राता लांबियां’, ‘दिल गलती कर बैठा है’, ‘तुम ही आना’, ‘लूट गए’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा जुबिन नौटियाल त्याच्या आगामी कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतोय. त्याला ट्रोल करत अनेक युजर्सनी अटक करण्याची पोलिसांकडे मागणीही केली.

जुबिन नौटियालच्या पुढील कॉन्सर्टचे पोस्टर ट्विटरवर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये आयोजकाच्या नावावरून गोंधळ सुरू आहे. अनेक युजर्सनी हे पोस्टर शेअर केले आहे. रेहान सिद्दीकी या एका व्यक्तीची पोस्ट सर्वाधिक रिपोस्ट करण्यात आली आहे. त्यांचा आवडता गायक ह्युस्टनला येत असल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप छान काम जयसिंग.’ असं कॅप्शन त्याने या पोस्टरला दिलं आहे.
आणखी वाचा- सारा अली खानशी डेटिंगच्या चर्चांवर शुबमन गिलच्या मित्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

या पोस्टमधील जयसिंगच्या नावावरुन हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयसिंग हा वाँटेड व्यक्ती आहे, ज्याचा पोलीस ३० वर्षांपासून शोध घेत आहेत. त्याच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी खलिस्तानला पाठिंबा देण्यासह अनेक गंभीर आरोप आहेत. तर सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार जयसिंग दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित आहे.

आणखी वाचा- “रिमिक्समुळे जुनी गाणी आणखी लोकप्रिय होतात”; गायकाची चकित करणारी प्रतिक्रिया

ही पोस्ट शेअर करत अनेक युजर्सनी आरोप केला की जुबिन नौटियाल देशद्रोहींची कॉन्सर्ट करतात. हे देशाच्या विरोधात आहे आणि अशा परिस्थितीत जुबिन नौटियाल यांना अटक व्हायला हवी. जुबिनसह पुन्हा एकदा युजर्सनी बॉलिवूडकरांवरही निशाणा साधला आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “याच कारणामुळे लोक बॉलिवूडकरांना बॉयकॉट करत आहेत.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “देशद्रोही माणसांसह जुबिन नौटियाल कॉन्सर्ट करत आहे हे खूपच निराशजनक आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “अशाप्रकारच्या लोकांसह जुबिन नौटियाल परफॉर्म करत आहे. मला या सगळ्याची खरंच लाज वाटत आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या