गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय मालिका ‘बड़े अच्छे लगते हैं’च्या २ऱ्या पर्वात काम करणार का ? अशी चर्चा रंगत आहे. अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेल्या  ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेला एक दशक लोटून गेलं आहे, तरी आजही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या पर्वाच्या प्रतिक्षेत आहेत. राम आणि साक्षी यांच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. ही सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका ठरली होती. लवकरच या मालिकेचे दुसरे पर्व येणार असल्याचे सांगितले जात होते. या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी नकुल मेहता आणि दिव्यांका त्रिपाठीला विचारणा करण्यात आली होती. या बाबत आता दिव्यांका यात काम करणार का ? या चर्चेला सध्या उधाण आले आहे.

दिव्यांकाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले की तिला या मालिकेसाठी विचारलं आहे. प्राथमिक बोलणी सुरू असल्याचेही तिने या मुलाखतीत सांगितले होते. आता दिव्यांकाने या बाबत मोठा खुलासा केला आहे. दिव्यांका गेले १५ वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. आजवर तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. एवढे वर्ष काम केल्यावर आता मला निवड करायचा हक्क आहे असं दिव्यांका त्रिपाठीचं म्हणणे आहे. तिने ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “इतके वर्ष काम केल्यावर आता एक कलाकार म्हणून मी कशात काम करणार? आणि कशात नाही? हे निवडण्याचा अधिकार मला आहे. जर का मी एका भूमिकेशी कनेक्ट होत नसेल, तर ते स्विकारणे चुकीच आहे. मी माझा निर्णय ‘बड़े अच्छे लगते हैं’च्या टीमला कळवला आहे.

या पुढे दिव्यांकाने सांगितलं की, “मला सगळे विचारत होते की बड़े अच्छे लगते हैं मध्ये काम करणार का? काय होतं की एखाद्या प्रोजेक्टसाठी तुमचं नावं जर सतत येत असेल तर इंडस्ट्री दुसऱ्या कलाकारांना त्या प्रोजेक्टसाठी विचारत नाही. दुसरी गोष्टं माझी आणि नकुल मेहताची जोडी बरोबर दिसली नसती असं मला वाटलं. तरी मी टीम सोबत लुक टेस्ट करण्यासाठी तयार झाले. काही सीन्सच चित्रीकरण देखील केले मात्र मी त्या पात्राशी कनेक्ट नाही करू शकले. म्हणून मी त्यांना माझा नकार कळवला.”

दरम्यान, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते. या बद्दल बोलताना दिव्यांका म्हणली की “कृपया अशा अफवा पसरवू नका. तारक मेहता ही  खूप लोकप्रिय मालिका आहे. यातील सगळीच पात्र खूप छान काम करतात. सगळ्यांनाच खूप प्रेम मिळत आहे. मी या मालिकेत काम करणार नाही” असे तिने स्पष्ट केले. दिव्यांका त्रिपाठी लवकरच कलर्सवरील स्टंट बेस रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये स्टंट करताना दिसणार आहे.