‘बाहुबली २’ सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. बाहुबलीचा ट्रेलर येऊन १५ दिवसही उलटले नाहीत तोवर हा ट्रेलर १० कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. यावरुन बाहुबलीबद्दलचे सर्वसामांन्यांमधले कुतुहल दिसून येते. अवंतिका ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या तमन्ना भाटियाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ.
पदार्पणः २१ डिसेंबर १९८९ ला जन्मलेल्या तमन्नाने १५ व्या वर्षांची असताना आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली होती. २००५ मध्ये आलेल्या ‘चांद सा रौशन चेहरा’ या सिनेमात तिने काम केले होते. याच वर्षी तिचा तेलगुमध्ये ‘श्री’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून तमन्नाचा दाक्षिणात्य सिनेमांशी संबंध आला आणि ‘बाहुबली’पर्यंत हा संबंध उत्तरोत्तर मजबूतही होत गेला.
कुटुंब: सिंधी कुटुंबात जन्मलेल्या तमन्नाचे बाबा हिऱ्याचे व्यापारी आहेत तर आई गृहिणी आहे. तमन्नाला एक मोठा भाऊही आहे. तमन्नाने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईमधून पूर्ण केले. तमन्नाला ‘मिल्क ब्युटी’ या नावानेही ओळखले जाते.
इंडियन आयडल कनेक्शन: तुम्हाला माहिती आहे का इंडियन आयडलचा पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंतचा एक अल्बम आला होता. या अल्बममधल्या ‘लफ़्ज़ों में कह न सकूं….’ हे गाणे तमन्नावर चित्रीत करण्यात आले आहे. २००५ मध्येच हे गाणेही चित्रित करण्यात आले होते.
पृथ्वी थिएटरः तुम्ही तमन्नाला ‘हिंमतवाला’ (२०१३), ‘हमशकल’ (२०१४), ‘एण्टरटेनमेन्ट’ (२०१४) या सिनेमांत पाहिले आहे. २०१५ मध्ये आलेला ‘बाहुबली- द बिगिनींग’मध्ये तमन्ना भाटियाच्या करिअरला फार मोठा ब्रेक मिळवून दिला. पण शाळेनंतर तमन्ना एका वर्षासाठी पृथ्वी थिएटरशी जोडली गेली होती. पृथ्वी थिएटरमध्ये तिने अभिनयाचे धडे गिरवले.
शाहरुख खान: तमन्नाने सिनेमां व्यतिरिक्त मॉडेलिंगमध्येही बरेच काम केले आहे. अनेक जाहिरातींमध्ये तुम्ही तिला पाहिले असेलच. एका जाहिरातीत तिने बॉलिवूडच्या किंगसोबत अर्थात शाहरुख खानसोबत काम केले आहे.
‘बाहुबली’च्या पहिल्या भागापेक्षा ‘बाहुबली २’ मध्ये तमन्नाची व्यक्तिरेखा कमी दाखवण्यात येणार आहे. या भागात महाराणी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीच्या व्यक्तीरेखेवर अधिक भर देण्यात येणार आहे. काही दिवसांच्याच प्रतिक्षेनंतर २८ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.