बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी लहरी यांच्या निधनाने संगीतविश्वातील आणखी एक तारा निखळला आहे. १९८०-९० च्या दशकात त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भूरळ घातली होती. आज बप्पी लहरी आपल्यात नसले तरी, त्यांचं संगीत चाहत्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. त्यांनी स्वतः अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या बागी ३ चित्रपटातील ‘भंकस’ हे त्यांचं शेवटचं गाणे होते.

तबला वाजवण्याची आवड

कदाचित अनेकांना माहीत नसेल की त्यांच्या काळातील प्रसिद्ध गायक किशोर कुमार हे बप्पी लाहिरी यांचे मामा होते. बप्पी लाहिरी यांना संगीत क्षेत्रात आणण्याचे श्रेयही किशोर कुमार यांना जाते. बप्पी लाहिरी यांनी लहानपणापासूनच गाणी शिकण्याची तयारी सुरू केली होती. ज्या वयात मुलं बोलायला आणि चालायला शिकतात त्याच वयात बप्पी लहरिंची वाद्यावर हातांची थाप पडू लागली. असे म्हणतात की बप्पी लहरी यांनी वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी तबला वाजवायला सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या करिअरची दिशा ठरवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बप्पी लहरी यांनी संगीताचे पहिले धडे त्यांच्या घरीच घेतले. त्यांचे वडील अपरेश लहरी हे बंगाली गायक होते आणि आई बासरी लहरी संगीतकार होत्या. मुंबईत संगीत क्षेत्रात नाव कमावण्यापूर्वी बप्पी लहरी यांनी बंगाली चित्रपटांमध्येही गाणी गायली होती. बप्पी लहरी केवळ २१ वर्षांचे असताना त्यांना १९७३ मध्ये ‘निन्हा शिकारी’ चित्रपटात संगीत देण्याची संधी मिळाली. बप्पी लहरी यांना १९७५ साली आलेल्या जख्मी चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी त्यांचे मामा किशोर कुमार आणि प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्यासोबत एक गाणे गायले होते. बप्पी लहरी शरीररुपाने जरी आपल्यात नसले तरी त्यांची गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.