Bhagyashree Talks About Salman Khan : बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीने १९८९ मध्ये सूरज बडजात्या यांच्या सुपरहिट चित्रपट ‘मैंने प्यार किया’ द्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सलमान खानने तिच्याबरोबर या चित्रपटात काम केले आहे. या सिनेमामुळे दोघेही रातोरात स्टार बनले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि भाग्यश्री चांगले मित्र बनले.

अलीकडेच, ब्युटीबायबीई या युट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान भाग्यश्रीने त्या काळातील आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितले की तिचे पालक तिच्या लग्नाच्या विरोधात होते आणि हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. भाग्यश्री म्हणाली, “जर तुम्हाला तुमची प्राथमिकता काय आहे हे माहित असेल तर निर्णय घेणे सोपे होते. हो, ते कठीण होते पण तरीही तुम्हाला धैर्य मिळते. हिमालय आणि मी शाळेच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो. मी ठरवले होते की माझ्या पालकांनी जरी या लग्नाचा विरोध केला तरी मी त्याच्याशीच लग्न करेन.”

सलमान खानबद्दल काय म्हणाली?

भाग्यश्री पुढे म्हणाली की, लग्नाच्या दिवशी जेव्हा तिच्या कुटुंबातील कोणीही तिच्या पाठीशी उभे राहिले नाही, तेव्हा सलमान खानने तिला पाठिंबा दिला. भाग्यश्री म्हणाली, “जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणीही माझ्या बाजूने नव्हते. सलमान संपूर्ण वेळ माझ्याबरोबर होता आणि लग्न झाल्यांनतर तो घरी गेला. ते खूप सुंदर आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होते.”

सलमान खोडकर होता : भाग्यश्री

सलमानबद्दल भाग्यश्री म्हणाली, “तो खूप खोडकर मुलगा होता पण तितकाच गोड होता. तो एक खरा मित्र होता, नेहमीच माझ्यासाठी उभा राहिला. माझ्यासाठी, सलमान अशी व्यक्ती आहे जी नेहमीच माझे रक्षण करत असे.” दोघेही त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मैंने प्यार किया’ मध्ये एकत्र दिसले.

लग्नानंतर भाग्यश्रीने अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम केले नाही. अलिकडच्या काळात ती ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ, ‘राधे श्याम’ आणि सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

अभिनेत्री भाग्यश्रीने हिंदीशिवाय भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. भाग्यश्री चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. स्टाइलच्या बाबतीत ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.