बॉलिवूडची हॉट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणने संजय लीला भन्साळींच्या ‘गोलीयों की रासलीला – राम-लीला’ चित्रपटात आपल्या गरमागरम अभिनयाच्या तडक्याने मोठ्या पडद्यावर ‘आग’ लावली होती. आता, याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी रणवीर आणि दीपिका पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. धाडसी मराठा योद्धा बाजीराव आणि लावण्यवती मस्तानी यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या चित्रपटात ते एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत. या आधी अभिनेत्री कतरिना कैफ किंवा प्रियांका चोप्रा मस्तानीची भूमिका करणार असल्याच्या अफवा उठत होत्या. परंतु, दीपिकाने तारखा दिल्या असल्याचे संजय लीला भन्साळींच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले. तर बाजीरावांच्या भूमिकेसाठी अभिनेता शाहरूख खान आणि अजय देवगण हे प्रमुख दावेदार होते.
करिना कपूर आणि हृतिक रोशनने करण जोहरच्या ‘शुद्धी’ चित्रपटातून काढता पाय घेतल्यावर या चित्रपटात रणवीर आणि दीपिका काम करणार असल्याच्या अफवा उठत होत्या. अद्याप आपण यापैकी कोणालाही चित्रपटासाठी करारबध्द केले नसल्याचे सांगत करण जोहरने या अफवांचे खंडन केले. सध्या संजय लीला भन्साळी हे प्रियांका चोप्रा अभिनय करत असलेल्या मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, अक्षय कुमार, श्रुती हसन आणि करिना कपूर खान काम करत असलेल्या ‘गब्बर’ चित्रपटाची ते निर्मितीदेखील करीत आहेत.
याआधी ‘गुंडे’ चित्रपटात दिसलेला रणवीर सिंग शाद अलीच्या ‘किल दिल’ चित्रपटात व्यस्त आहे, तर दीपिका पदूकोण फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख खान, अभिषेक बच्चन, सोनू सुद, बोमन इराणी आणि विवान शहा यांच्यासुद्धा भूमिका आहेत.