भारती सिंगने लहानपणापासूनच खूप संघर्ष पाहिला आहे. तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी खूप मेहनत केली आणि भरपूर पैसे कमवले. भारती सिंग आज एक आलिशान जीवनशैली जगते. भारती सिंग ही टॉप कॉमेडियन्समध्ये समाविष्ट आहे. भारती सिंग तिच्या शैलीने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

भारती शेवटची ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये होस्ट म्हणून दिसली होती, परंतु आता भारती सिंग तिच्या ब्लॉग आणि पॉडकास्टद्वारे चाहत्यांशी जोडलेली आहे. अलीकडेच भारती सिंगने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल उघडपणे सांगितले.

भारती सिंग ही सामान्य कुटुंबातून आली आहे. तिने पहिल्यांदाच विमान प्रवास केला तेव्हा तिला एका कॉमेडी शोसाठी मुंबईला बोलावण्यात आले होते. त्याआधी तिने लहानपणी कठीण प्रसंग अनुभवले होते. ती फक्त दोन वर्षांची असताना तिचे वडील वारले, त्यामुळे तिच्या २२ वर्षांच्या आईला स्वतःचा आणि तिच्या तीन मुलांचा उदरनिर्वाह करावा लागला. भारतीने सांगितले की, तिची आई घरकाम करायची आणि तिला अनेकदा कमी लेखले जायचे, याचा भारतीच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला.

राज शमानी यांच्याशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की, ती तिच्या सर्व कर्मचाऱ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागते, कारण तिने लहानपणी पाहिले होते की तिची आई दुसऱ्यांच्या घरी काम करत होती तेव्हा तिला कसे वागवले जात होते. “मला आठवते की माझ्या आईला मालकाने फटकारल्यानंतर ती घरी यायची, ती माझ्या बहिणीला याबद्दल सांगायची. जर तिच्याकडून प्लेट किंवा काहीतरी तुटले तर ती नाराज व्हायची. कधीकधी तिला दुखापतही व्हायची आणि तिच्या हातावर पट्टी दिसायची. दिवाळीला आम्ही आमच्या आईची आतुरतेने वाट पाहायचो, कारण आम्हाला माहीत होते की तिला मिठाईचा डबा मिळेल. आम्हाला कधीही मिठाई परवडत नव्हती. आम्हाला फटाके परवडत नव्हते. आम्ही नवीन कपडे खरेदी करण्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. तिच्या मालकांकडून मला जुने कपडे मिळायचे,” असं भरती म्हणाली.

भारती पुढे म्हणाली की, तिच्या आईचे लग्न ती १५ वर्षांची असताना झाले आणि २० वर्षांची झाली तेव्हा तिला तीन मुले झाली. २२ वर्षांची झाली तेव्हा ती एकटीच राहिली. “माझी आई सुंदर होती, तिचे केस लांब होते. ती पुन्हा लग्न करू शकली असती, पण ती मदतनीस बनली. मी एका मदतनीस महिलेची मुलगी आहे. मला आठवते, काही दिवस ती काम करत असताना मी तिच्याबरोबर जायचे आणि स्त्रिया तिला व्यवस्थित साफसफाई करायला सांगायच्या. त्या माझ्या आईला उरलेले अन्न द्यायच्या आणि आम्हाला कोफ्ता किंवा दाल मखनी खायला मिळाल्याने आम्हाला खूप आनंद व्हायचा.”

तिच्या वडिलांना गमावल्याबद्दल आणि लहानपणी तिला कसे वाटले याबद्दल बोलताना भारती म्हणाली, “मी दोन वर्षांची होते तेव्हा माझे वडील वारले. त्यांना कॉलरा झाला होता आणि दारू प्यायल्यानंतर खोकताना त्यांच्या तोंडातून रक्त यायचे. माझ्याकडे त्यांच्या कोणत्याच आठवणी नाहीत. आजही घरी त्यांचा फोटो आहे, पण मी त्यांना ओळखत नाही. ते एक माझ्यासाठी अनोळखी आहेत. कोणाचे वडील आहेत आणि कोणाचे नाहीत या आधारावर शिक्षक आम्हाला वेगळे करायचे; कारण ज्या मुलांना वडील नाहीत त्यांना शाळेची पुस्तके दिली जायची. मला वडील काय असतात हे माहीत नव्हते, मी माझ्या मित्रांना त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना ऐकत असे. मला कळले की वडील कडक असतात आणि ते भेटवस्तू आणतात; मला माहीत नव्हते. मला असे वाटायचे की मी वेगळी आहे.”

भारती आता भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. ती कपिल शर्माशी बऱ्याच काळापासून जोडलेली आहे आणि आता ती ७० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्ससह एक प्रचंड लोकप्रिय YouTube चॅनेल चालवते.