कॉमेडी क्वीन भारती सिंग तिच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने सर्वांना हसवते. भारती सिंगने लहानपणापासूनच संघर्ष पाहिला आहे. आज तिनं जे स्थान मिळवलं आहे, तिथे पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे. अलीकडेच भारतीनं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला गेल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. त्यावेळी तिला गुड टच, बॅड टच माहीत नव्हतं.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंगनं हा धक्कादायक प्रसंग सांगितला. भारतीनं सांगितलं की, तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्यात आला होता. भारती म्हणाली, “जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी कॉलेजमध्ये कॉमेडी स्किट सादर करण्यासाठी जायचे. तेव्हा मला काही समजत नव्हतं. आजकाल मुलांना ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ (गुड टच, बॅड टच) शिकवतात; पण मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं.”
भारती सिंगबरोबर बसमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार
भारती म्हणाली, “मी कॉलेजमधून तीन दिवस सुट्टी घ्यायचे आणि माझे मित्र एका छोट्या कॉलेजला जायचे. मी सकाळी ५ वाजताची बस पकडायचे. त्या बसमध्ये सर्व लोक दूधवाले होते. जागा नसायची. दीड वर्ष मला समजलं नाही की, ते माझी छेड काढायचे. जेव्हा कोणीतरी मला घट्ट पकडलं, तेव्हा मला थोडंफार समजलं; पण तरीही मी विचार करीत राहिले की, तो पडत असेल आणि त्याचा हात त्याच ठिकाणी लागला असेल.”
भारतीनं पुढे सांगितलं, “मी जशी मोठी झाली तेव्हा मला ‘गुड टच आणि बॅड टच’ समजला. आम्हाला कधीच कोणी याबाबत सांगितलं नाही. त्याबद्दल आई आणि बहिणीही बोलण्यास लाजत होत्या. जेव्हा मला हे समजलं, तेव्हा माझ्यातील ‘भारती’ जागी झाली आणि मी अनेक लोकांना कोपरा मारला. माझ्यापेक्षा मोठ्या मुलांनाही मी मारलं, भलेही नंतर माझे हात थरथरले. ही छेडछाड बसमध्ये व्हायची.”
भारतीनं सांगितलं की, कपिलच्या शोमध्येही अनेकदा लोक तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. कपिल मला ओरडायचा, तू त्यांना असं का करू देतेस, असं म्हणायचा. भारती म्हणाली की, ती कपिलकडून खूप गोष्टी शिकली आहे. भारती म्हणाली की लोक तिचे गाल ओढू लागले म्हणून आता तिला अंगरक्षक ठेवावा लागला. भारतीनं सांगितलं की, लोक तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ लागले आहेत. तिला मूल झाल्यापासून ती घाबरू लागली आहे.