राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट २३ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राजकुमार राव स्टारर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली.
चित्रपटाला चांगली सुरुवात झाल्याने, आठवड्याच्या शेवटी त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी चांगले होण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. एक सुनील शेट्टी आणि सूरज पंचोली यांचा ‘केसरी वीर’ आणि दुसरा तुषार कपूर यांचा ‘कपकपी’. परंतु, दोन्ही चित्रपटांची कमाई ‘भूल चूक माफ’पेक्षा कमी आहे.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या ‘भूल चूक माफ’ने पहिल्या दिवशी ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्क वेबसाइटवरील वृत्तानुसार, संपूर्ण भारतात हिंदी २डी श्रेणीमध्ये चित्रपटाची एकूण १९.३६% प्रेक्षकसंख्या होती. सकाळच्या शोची सुरुवात ९.४०% प्रेक्षकसंख्याने झाली, जी रात्रीपर्यंत हळूहळू ३१.२७% पर्यंत वाढली. प्रदेशानिहाय, या चित्रपटाची राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) २१.५% प्रेक्षकसंख्या होती, त्यानंतर बेंगळुरूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर २५% प्रेक्षकसंख्या आहे. मुंबई व पुणे या शहरांमध्ये अनुक्रमे १९.५% व १७.७५% प्रेक्षकसंख्या नोंदवली गेली.
‘केसरी २’ने पहिल्या दिवशी सुमारे ७.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता ‘भूल चूक माफ’ या आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत करू शकेल की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.
‘भूल चूक माफ’ची कथा काय?
‘भूल चूक माफ’ चित्रपटाची कथा रंजन तिवारी नावाच्या मुलाची आहे, जो बनारसमध्ये त्याच्या पालकांबरोबर राहतो. रंजनला तितली मिश्रा नावाच्या मुलीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे असते. दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करतात; परंतु त्यांचा विचार बदलतो. दोघेही थेट पोलिस ठाण्यात जातात. त्यांच्या पालकांना त्यांच्या या प्लॅनबद्दल कळते. नंतर दोघांचेही पालक याबाबत सहमत होतात आणि तितलीचे वडील रंजनसमोर एक अट ठेवतात की, रंजनला दोन महिन्यांत सरकारी नोकरी मिळवावी लागेल. राजकुमार रावने रंजनची भूमिका इतकी सुंदरपणे साकारली आहे की तो अभिनय करत आहे असे वाटत नाही.
या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याबरोबर संजय मिश्रा, रघुवीर यादव, जाकिर हुसैन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.