हिंदी-तेलुगू चित्रपट, म्युझिक व्हिडीओ व ‘बिग बॉस १७’मध्ये दिसणारी ही अभिनेत्री ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर गेली आहे. या अभिनेत्रीने तिच्या करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे.

आम्ही सोनिया बन्सलबद्दल बोलत आहोत. सलमान खानच्या शोमुळे सोनियाला प्रत्येक घरात ओळख मिळाली. आता तिने एक नवीन प्रवास सुरू केला आहे. अभिनेत्रीने स्वतः अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत याची घोषणा केली आहे. त्यामागील कारणही तिने सांगितले आहे. एवढेच नाही, तर तिने अभिनय सोडल्यानंतर काय करणार हेदेखील सांगितले आहे.

सोनियाने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, “आपण इतरांसाठी गोष्टी करण्यात इतके व्यग्र होतो की, आपण स्वतःला विसरून जातो. अलीकडच्या काळात मला जाणवले की, मला माझा खरा उद्देश काय आहे हेदेखील माहीत नाही. पैसे कमावण्याच्या नादात मी स्वतःला गमावले आहे”.

सोनिया पुढे म्हणाली, “पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता… माझ्याकडे सर्व काही होते; पण माझ्याकडे एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे शांती आणि जर तुमच्याकडे शांती नसेल, तर तुम्ही पैशाचे काय कराल? तुमच्याकडे खाण्यापिण्यासाठी सर्व काही असेल; पण आतून तुम्ही रिकामेच राहाल.”

सोनिया म्हणाली, “मला काय हवे आहे? मला त्याचा अभ्यास करायचा आहे. या इंडस्ट्रीने मला ओळख दिली; पण मला शांती दिली नाही. मला श्वास घेऊ दिला नाही. मला आता दिखावा करायचा नाही. मला जगायचे आहे आणि लाइफ कोच बनायचे आहे. तुमचे आयुष्य कधी बदलेल हे तुम्हाला कधीच कळत नाही? मृत्यू कधी आणि कोणाच्या दारावर ठोठावेल हे कोणालाच सांगता येत नाही. जर तुम्ही तोपर्यंत तुमचे आयुष्य जगले नसेल तर? या संपूर्ण प्रवासाचा अर्थ काय असेल?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ वर्षीय सोनिया बन्सलने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०१९ मध्ये ‘नॉटी गँग’ या चित्रपटातून पदार्पण केले. ती २०२१ मध्ये ‘डबकी’, ‘गेम १०० करोड का’, २०२२ मध्ये ‘शूर वीर’ व २०२३ मध्ये ‘धीरा’ या तेलुगू चित्रपटात दिसली. सध्या ती तिच्या पुढच्या आणि कदाचित शेवटच्या ‘येस बॉस’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे.